
शिवसेनेला खतम करणे म्हणजे महाराष्ट्र खतम करणे होय. हे काम एका मराठी माणसाने म्हणजे राहुल नार्वेकर यांनी केले आहे. हे अध्यक्ष बेकायदेशीर आहेत तसा हा निर्णयही बेकायदेशीर आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज वाचून दाखवलेला निकाल हा मॅच फिक्सिंग असून दिल्लीतून या निकालाचा ड्राफ्ट तयार करण्यात आला होता. दिल्लीतून दिलेला हा ड्राफ्ट अध्यक्षांनी वाचून दाखवला आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते – खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.विधानसभा अध्यक्षांना वाटते आहे की, तेच एकटे शहाणे आहेत. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. कारण सर्वोच्च न्यायालय शहाणे आहे. आता सर्वोच्च न्यायालयच काय ते ठरवेल. शिवसेनेची न्यायालयीन लढाई सुरूच राहील, असेही ते म्हणाले. बेकायदेशीर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला हा बेकायदेशीर निर्णय आहे. गुजरात लॉबीने कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपणार नाही. एकनाथ शिंदेंनी शिवसेना खतम करण्याचा जो प्रयत्न केला, जे पाप केले, त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. हा मराठी माणसासाठी अत्यंत काळा दिवस आहे, असा संताप खासदार राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना सामान्यांच्या रक्ताच्या कणाकणात
भाजपचे हे षड्यंत्र होते की, एक दिवस बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही संपवून टाकू. मात्र शिवसेना अशी संपणार नाही. शिवसेना ही सामान्य माणसांत आहे, शिवसेना आमच्या रक्ताच्या कणाकणात आहे.
शिवसेना संपवण्याचे गुजराती लॉबीचे काम
भरत गोगावले बेकायदेशीर व्हीप आहेत. राज्यपालांची कृती बेकायदेशीर आहे. राज्यपालांना बहुमत ठरवण्याचा अधिकार नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे गुजराती लॉबीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम राहुल नार्वेकर करत आहेत. महाराष्ट्रद्रोह्यांशी त्यांनी हातमिळवणी केली आहे. हे गुजरात लॉबीचे पाप आहे. दिल्लीतले दोघे जण हे ठरवून करत आहेत.
ही मॅच फिक्सिंग
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला हा निकाल ही मॅच फिक्सिंग आहे. वडिलांना दिलेल्या वचनासाठी प्रभू श्री राम वनवासात गेले. आज शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राजकीय पिता असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला वनवासात पाठवण्याचे काम केले आहे. त्यामुळे रामाचे नाव घ्यायचा त्यांना काहीही अधिकार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
























































