
शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेचं, सार्वजनिक मालमत्तेचं आणि महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारला एक दिवसही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्यांनी मान्य करायलाच हवं. मागील 24 तासांपासून सीमाभागामध्ये सरकारी प्रेरणेने महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड सुरू आहे. केंद्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार आहे. कर्नाटकच्या हल्ल्यांना प्रतिकार करणाऱ्या आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक केली जात आहे. महाराष्ट्र सरकार अस्तित्वात आहे की नाही. ज्या महाशक्तीच्या जोरावर हे सरकार सत्तेत बसलं त्या महाशक्तीला आमची मागणी आहे, तातडीने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा, नाहीतर या महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. मग तुमचं सरकार गेलं खड्ड्यात. असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत चाललेत. याचा काय उपयोग आहे. महाराष्ट्रात काय चाललंय हे त्यांना कळत नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत म्हणूनच शिवसेनेचं सरकार सत्तेतून हलवलं आहे. अशाप्रकारची वेळ महाराष्ट्रावर कधीच आली नव्हती. इतका हतबल मुख्यमंत्री, हतबल सरकार, लाचार सरकार या महाराष्ट्राने गेल्या 55 वर्षांमध्ये पाहिलं नाही. सरकारमधील मंत्र्यांनी काल शेपूट घातलं, आणि हे स्वतःला मर्द आणि स्वाभिमानी समजतात. या डरपोक सरकारला महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही. या राज्याच्या सीमा कुरतडल्या जात आहेत. 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवलेली आहे. मात्र आज महाराष्ट्र चहूबाजूंनी कुरतडला जात आहे. मात्र हे सरकार षंढासारखं आणि नामर्दासारखं बसलं आहे. हे सरकार नामर्दच आहे. मात्र अशावेळी विरोधीपक्षाची जबाबदारी सर्वात जास्त आहे. जेव्हा जेव्हा असं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. तेव्हा तेव्हा महाराष्ट्रानं लढाई केलेली आहे.
या सरकारनं मागच्या 3 महिन्यात महाराष्ट्र दिल्लीच्या दारातलं पायपुसणं करून टाकलं आहे. महाराष्ट्राची लूट सुरु आहे. ही लूट दिल्लीच्या चरणी अर्पण करता यावी म्हणून हे सरकार बसवलं आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. आपल्या मुख्यमंत्र्यांना भाई असे म्हणतात ना, मग तुमची भाईगिरी दाखवा ना. नाहीतर तुम्ही कसले भाई. तुम्ही बेळगावात जाऊन कधी लाठ्या खाल्ल्या? या सरकारला एक मिनिटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. एकीकडे आसाम आणि मेघालय यांचा सीमावाद सुरु आहे. आज अचानक हा प्रश्न उफाळला आहे. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊच शकत नाही. असे संजय राऊत म्हणाले.
एकीकडे महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला पळवायचे. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या नाड्या आवळ्याच्या. दुसरीकडे सोलापूर सांगलीवर कर्नाटकने दावा सांगायचा, कधी नव्हे ते डांग उमरगाव गुजरातचे आहे म्हणून सांगायचं. इकडे मुंबईवर हल्ला सुरूच आहे. मग महाराष्ट्र राहिलाच कुठे? महाराष्ट्र कमजोर होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तोंडाला कुलूप लावून बसलेत का? मिंधे गटाला ढाल तलवार ऐवजी कुलूप निशाणी द्यायला हवी. हे सरकार तंत्र मंत्र यातच अडकलं आहे. या सरकारला स्वाभिमान नाही, महाराष्ट्राविषयी प्रेम नाही. दिल्लीला टेंडर भरून आलेलं हे सरकार आहे. या टेंडरचा आकडा माझ्याकडे आहे. तुम्ही माझं काय करणार. परत तुरुंगात टाकणार असाल तर टाका पण महाराष्ट्रासाठी आम्ही प्राणांची बाजी लावू. असे संजय राऊत म्हणाले.
कालच शरद पवारांनी सांगितलंय की संयमाचा कडेलोट झाला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात जायला तयार आहोत. या लढ्यासाठी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, एन डी पाटील अशा दिग्गजांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. आणि नामर्द सरकार गप्प आहे. ‘आरे’ ला ‘कारे’ करू असं म्हणणारे आशिष शेलार कुठे आहेत? तुमच्यात दम असेल ना तर का रे करून दाखवा. जर महाराष्ट्र पेटला तर त्याला जबाबदार केंद्र सरकार आणि देशाचे गृहमंत्री असतील. त्यांना 106 हुतात्मे पुन्हा हवे असतील तर आम्ही गोळ्या खायला तयार आहोत. बोम्मई हे काँग्रेस मधून भाजपात आलेत तर शिंदे शिवसेनेतून भाजपात गेलेत. त्यामुळे दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. मात्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्राचं जे नुकसान झालं आहे त्याची वसुली कर्नाटक कडून करा. असे राऊत म्हणाले.































































