शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे सरकार सत्तेवर येईल,शरद पवार यांचा विश्वास

413
sharad-pawar

बहुमत पाठीशी नसताना भाजपने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र विश्वासदर्शक ठरावावेळी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, अजित पवार यांनी बंड का केले याची आपल्याला माहिती नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांनी आज कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, अजित पवार यांनी बंड का केले आपल्याला माहिती नाही. आपण व्यक्तिशः त्यांच्याशी संपर्क केला नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सत्तेचा गैरवापर करून हवे तसे निर्णय भाजपने घेतले आहेत. तरी बहुमत सिद्ध करताना याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर फडणवीस आणि अजित पवार आज पदभार स्वीकारणार या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी शपथ घेतल्यानंतर पदभार स्वीकारणे हा प्रोटोकॉल आहे, मात्र ही निवड वैध आहे का हा खरा प्रश्न आहे. पक्ष म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील नाही. अनेक संकटांतून गेलो, मार्ग निघेल, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या