मुंबई-गोवा महामार्गावरील समस्यांबाबत शिवसेनेचा संसदेत आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई–गोवा महामार्ग आणि वाहतुकीशी निगडित समस्यांवर शिवसेनेने आज संसदेत जोरदार आवाज उठवला. मुंबई–गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबरोबरच सर्वच महामार्गांची दुरुस्ती करा आणि वाहतुकीशी निगडित समस्या तातडीने दूर करा, अशी मागणी शिवसेनेने केली. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकसभेत यासंदर्भात निवेदन सादर केले. त्यात त्यांनी महामार्गाची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत आणि अपघात रोखले जावेत यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

अपघात रोखण्यासाठी सर्वच महामार्गांची दुरुस्ती गरजेची

देशात 1 लाख 32 हजार 500 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 25 कोटी 30 लाख वाहने त्याचा वापर करतात. या महामार्गांवर रोज सुमारे 3700 अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो तर 20 लाखांहून अधिक जखमी होतात. ते अपघात टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी महामार्गांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अशी सूचनाही खासदार कीर्तिकर यांनी मांडली.

अपघात का होत आहेत?

महामार्गांवर अपघात होण्यामागचे एक महत्त्वाचे कारणही खासदार कीर्तिकर यांनी लोकसभेच्या निदर्शनास आणून दिले. देशात वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता आरटीओ कार्यालयांत कर्मचाऱयांची संख्या अत्यंत कमी आहे. अवजड वाहनांचे परवाने नूतनीकरण करताना मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होऊन फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. त्यामुळेच वाहनांचे अपघात होतात असे खासदार कीर्तिकर यांनी निवेदनात म्हटले आहे. विमानांच्या पायलटना जसे दरवर्षी सिम्युलेटर पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते त्याच धर्तीवर अवजड वाहनांच्या चालकांना प्रशिक्षण देण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी मांडली.

…अशा मांडल्या सूचना

  • मुंबईतील दिंडोशी उड्डाण पुलाची तातडीने दुरुस्ती करा.
  • कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे महामार्गाखालून प्राण्यांसाठी बोगदा बनवा.
  • खेडच्या जगबुडी नदीवरील पूल रुंद करा.
  • जगबुडी नदी पूल ते भारत घाटदरम्यानच्या घातक वळणावरील अपघात रोखण्यासाठी डोंगराचा काही भाग पाडून सरळ रस्ता बनवा.
  • कशेडी घाटातील बोगद्याचे काम तत्काळ पूर्ण करा.
  • इंदापूर-झाराप, इंदापूर ते वडपाले, परशुराम घाट ते वाकेड रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करा.
  • महामार्गांवर दिशादर्शक फलक योग्य रीतीने लावावेत.
  • वाहनांच्या इन्शुरन्समधून मोठय़ा प्रमाणात नफा कमावणाऱया कंपन्यांकडून निधी घेऊन महामार्गांवर सुरक्षेसाठी उपाययोजना करा.
  • अपघातांची संख्या लक्षात घेऊन मोटार वाहन ट्रिब्युनल न्यायालयांची संख्या वाढवा.
  • सर्व वाहनांना मागील बाजूस रिफ्लेक्टर लावण्याची सक्ती करा.
  • सर्व महामार्गांवर सीसीटीव्ही लावा. वेगाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करा.
  • जुन्या वाहनधारकांना पुढील दहा वर्षे सेंट्रल एक्साईज डय़ुटी माफ करा.