दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात

सामना प्रतिनिधी । जालना

संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघतो आहे. दुष्काळ गंभीर असला तरी शिवसेना खंबीर असून शेतकऱयांच्या पाठीशी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवार, 9 जून रोजी जालना जिल्हय़ाच्या दौऱयावर येत असून ते चारा छावणीची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱयांना अन्नधान्याचे वाटपही करण्यात येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी सकाळी 8 वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने जालन्याकडे रवाना होतील. जालना तालुक्यातील साळेगाव येथील चारा छावणीस ते सकाळी 10 वाजता भेट देतील. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येथे शेतकऱयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

जालना जिह्यात 34 चारा छावण्या असून यात 22 हजार 227 जनावरे आहेत. जनावरांच्या व्यवस्थेसाठी चारा छावणीत थांबलेल्या पाच हजार शेतकऱयांना शिवसेनेच्या वतीने अन्नधान्याची मदत करण्यात येणार आहे. यामध्ये कणकेपासून तांदळापर्यंत आणि मिठापासून तिखटापर्यंत सर्व जिन्नस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.