
सिल्लोड – सोयगाव तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा, परतीच्या पावसामुळे शेतमालाचे पूर्ण नुकसान झाल्याने नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतकर्यांना 100 टक्के पीक विमा मिळावा, शेतकर्यांना 2 रुपये दराने धान्य, तसेच जनावरांना दावणीवर चारा उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार व इतर पदाधिकारी बैलगाडीत होते. तर अनेक शेतकर्यांनी नुकसान झालेला शेतमाल घेऊन ट्रॅक्टरवर होते. हजारो शेतकर्यांनी या मोर्चात सहभाग नोंदविला. कोंब फुटलेली मका, ज्वारी, सोयाबीन, बाजरीची कणसे घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चेकरांना संबोधित करण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने प्रियदर्शनी चौकाजवळ व्यासपीठ उभारण्यात आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रशासन आणि विमा कंपन्यांचा जोरदार समाचार घेत केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास याहून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
पुढे बोलताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात शेतकर्यांच्या बांधावर जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असून, त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.
पीकविमा कंपनी काही तासांच्या आत नुकसान झाले त्याचा अर्ज करायला सांगत आहे. पीकविमा कंपन्या शेतकर्यांची दिशाभूल करून त्यांची फरफट करीत आहे. विमा कंपन्यांची बनवेगिरी खपून घेणार नाही. शंभर टक्के नुकसान झालेले आहे. शेतकर्यांना शंभर टक्के विमा मिळालाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
शिवसेना शेतकर्यांच्या पाठीशी
आज मातोश्रीवर अत्यंत महत्त्वाची बैठक होती. सिल्लोडचा मोर्चा नियोजित होता. त्यातच मतदारसंघात दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याने या ओल्या दुष्काळाची दाहकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यांनी शिवसेनेची पहिली बांधिलकी शेतकर्यांसोबत आहे. असे म्हणत आधी शेतकर्यांच्या प्रश्नाचे बघा असा आदेश दिला.


























































