भाजपमुळे 40 टक्के नव्हे तर 100 टक्के मुंबईकरांचे नुकसान! शिवसेनेचा जोरदार पलटवार

स्थायी समितीच्या माध्यमातून विकासकामांसाठी होणाऱया निधीवाटपात ‘असमानता’ झाल्याच्या भाजपच्या आरोपाला शिवसेनेने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून भाजपमुळे 40 टक्के नव्हे तर 100 टक्के मुंबईकरांचे नुकसान झाल्याचा घणाघात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज केला. विकासनिधीवरून भाजपने केलेल्या आरोपांमुळेच निर्माण झालेल्या संभ्रमामुळेच आयुक्तांनी मंजूर केलेल्या निधीपैकी तब्बल 325 कोटी रुपये कमी करून यावर्षी फक्त 650 कोटी मंजूर केल्याचेही जाधव यांनी सांगितले.

मुंबईच्या विकासकामांसाठी अर्थसंकल्पातून स्थायी समितीला ठरावीक निधी दिला जातो. गेल्या वर्षी 750 कोटींचा निधी देण्यात आला होता. हा निधी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर सर्व पक्षांना वाटप केला जातो. यावर्षी स्थायी समितीला एक हजार कोटींचा निधी द्यावा अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आयुक्तांकडे केली होती.

यावेळी किमान 900 कोटींपेक्षा जास्त निधी देणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र याच दरम्यान भाजपकडून जाणीवपूर्वक शिवसेनेला बदनाम करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्याने संभ्रम-संशयाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे आयुक्तांनी आश्वासन दिलेल्या निधीपैकी केवळ 650 कोटीच स्थायी समितीला मंजूर केल्याचे जाधव यांनी सांगितले. भाजपमुळेच सर्व मुंबईकरांचे 325 कोटींचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृहात प्रत्युत्तर देणार – भाजप

स्थायी समितीच्या निधी वाटपात ‘असमानता’ असल्याचा आरोप आज भाजपने पत्रकार परिषदेत केला. स्थायी समिती अध्यक्षांनी महाविकास आघाडीमधील पक्षांना जादा निधी दिला असून 40 टक्के मुंबईकरांचे प्रतिनिधित्व करणाऱया 83 नगरसेवक असलेल्या भाजपला कमी निधी दिल्याचे भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले. याबाबत पालिकेच्या सभागृहात चोख प्रत्युत्तर देणार असल्याचेही शिंदे म्हणाले. यावेळी नगरसेवक भालचंद्र शिरसाट उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या