अंधेरी पुल दुर्घटनेवरून शिवसेनेने पालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरीच्या गोखले पादचारी पुलाच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेची होती मग त्या पुलावर युटीलिटी वायर्सना परवानगी कशी काय दिली? लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याबरोबरच जबाबदारी झटकणाऱया अधिकाऱयांना स्थायी समितीमध्ये सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. धोकादायक पुलांकडे दुर्लक्ष करणाऱया अधिकाऱयाची चौकशी करून कारवाई करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

मंगळवारी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळच्या गोखले पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आज लगेचच ग्रॅण्ट रोडच्या पुलाला तडे गेल्याची घटना घडली. यामुळे रेल्वेवरील पादचारी आणि वाहतूक पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्दय़ावरून आज स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेच्या अधिकाऱयांना कोंडीत पकडले. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाच्या आणि अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणाविरुद्ध स्थायी समितीची सभा झटपट तहकूब करण्यात आली.

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर या पुलाच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेची असल्याची माहिती देऊन प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. या प्रकारामुळे पालिकेला टीकेला सामोरे जावे लागले. आज स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या विभागातील रेल्वे पुलांची, पादचारी पुलांच्या दुरवस्थेबाबतचा पाढाच वाचला. पालिकेचे पूल विभागातील अधिकारी कसे बेजबाबदारपणे वागतात याचीही माहिती सभागृहाला दिली.

अंधेरी दुर्घटना पादचारी पुलाचा मालकी हक्क पालिकेचा आहे, मात्र हा पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याने देखभाल रेल्वेनेच करायला हवी. पालिका यासाठी पैसै देते असा खुलासा प्रशासनाने स्थायी समितीत करून पुन्हा जबाबदारी झटकल्याने नगरसेवक संतापले. मग उपयोगिता सेवा (युटीलिटी) म्हणजे केबल, मोबाईल सेवांसाठी पालिका परवानगी का देते, असा सवाल नगरसेवकांनी विचारला. त्यावर याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱयावर कारवाई करावी व काय कारवाई केली याबाबत येत्या सभेत माहिती द्यावी असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

चूक आहे ते चूकच आहे
एखादी इमारत धोकादायक ठरली की ती इमारत रिकामी करण्यासाठी अधिकारी अगदी जोमाने सुपारी दिल्यासारखे कामाला लागतात. मग पादचारी पूल धोकादायक झालेले असताना त्यावर कोणतीच कारवाई तातडीने का करत नाही? रेल्वेला निधी दिला म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही. पूल सुस्थितीत आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल यावेळी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला.

जुन्या पुलांची दुर्दशा
दादर येथील टिळक ब्रिज व एल्फिन्स्टन ब्रिज हे १०० वर्षांहून जुने आहेत. हे दोन्ही पूल सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे ट्रकवरून जातात. त्यामुळे काही दुर्घटना झाली तर किती जीवितहानी होईल याची कल्पना करता येत नाही. या पुलांबाबत अनेकदा मीटिंग बोलावली मात्र त्याला पालिकेचे अधिकारी उपस्थित राहत नाहीत अशी माहिती सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली. तसेच माटुंग्याचा झेड ब्रिज, धारावीचा पूल, दादरचा विजयनगर पूल यांची दुरवस्था झाली असून पालिकेचे अधिकारी या पुलांना पर्यायही शोधत नसल्याचे त्या यावेळी म्हणाले, तर नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी माहीम कॉजवे येथील पादचारी पुलाची व्यथा मांडली. हा पूल धोकादायक झाला असून त्यावर काहीच कारवाई होत नसल्यामुळे उद्या दुर्घटना झाल्यास लोकप्रतिनिधींना धारेवर धरले जाणार असल्याचा इशारा वैद्य यांनी दिला.

पश्चिम रेल्वेला एक कोटीचे नुकसान
पश्चिम रेल्वेचा अंधेरीतील गोखले पूल कोसळल्याच्या अपघातामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांना फटका बसल्याने रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच उपनगरीय गाडय़ा रद्द झाल्याने १९ हजार रुपयांचा तर लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांना ४० लाख रूपयांचा रिफंड देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेचे एका दिवसाच्या तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न दोन कोटी रुपये इतके आहे. परंतु सकाळी ७.३० वाजल्यापासून पश्चिम रेल्वे ठप्प झाल्याने मंगळवारच्या दिवसभरात पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनला केवळ ९३ ते ९५ लाखांचे उत्पन्न मिळाले. तसेच उपनगरीय मार्गावरील अनारक्षित तिकिटांचा रिफंड म्हणून १९ हजार तर नॉन सबर्बन अनारक्षित तिकिटांचा सात हजारांचा रिफंड देण्यात आला.