
सामना ऑनलाईन,मुंबई
नोकरभरतीत मराठी माणसांना 80 टक्के प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीचा सतत पाठपुरावा करणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे महाअधिवेशन रविवार, 13 जानेवारी रोजी वरळी येथे होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक असून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ ही शिवसेनेची अंगीकृत संघटना आहे. नोकरभरतीत भूमिपुत्रांवर अन्याय होत होता. सर्व नोकऱ्या परप्रांतीयांच्या पदरात टाकल्या जात होत्या. त्याविरुद्ध आवाज उठवून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून विविध आस्थापनांमध्ये लोकाधिकार समित्यांची स्थापना झाली. त्या समित्यांना 1972 मध्ये महासंघाच्या माध्यमातून एकसूत्र केले गेले.
बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, हवाई कंपन्या, संशोधन संस्था, रेल्वे, गोदी उद्योग, केंद्र शासनाची कार्यालये तसेच खासगी कंपन्यांमध्ये मराठी टक्का वाढवण्याचे श्रेय महासंघाला जाते. शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या महासंघाचे कार्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष, खासदार गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ आणि सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या सुरू आहे.
सात हजारांवर प्रतिनिधी उपस्थित राहणार
13 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महासंघाचे महाअधिवेशन वरळी येथील डोम एनएससीआय येथे होणार आहे. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील आणि दिल्लीतील ‘लोकमत हिंदी’चे संपादक सुरेश भटेवरा हे उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत. महासंघाशी संलग्न असलेल्या विविध समित्यांमधील सात हजारांवर प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे नेते, मंत्री, उपनेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, मुंबईचे महापौर आणि शिवसेनेच्या संलग्न संघटनांचे पदाधिकाऱ्यांनाही अधिवेशनाचे निमंत्रण आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत, अशी माहिती शिवसेना भवन येथील महासंघाच्या कार्यालयातून देण्यात आली.
























































