पारशिवनी : नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेश उपदेव । नागपूर

जिल्ह्यातील नव्याने झालेल्या दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात पारशिवनी येथे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या प्रमीला कुंभलकर विजयी झाल्या आहेत. तर वानडोंगरी येथे भाजपच्या वर्षा शहाकार यांनी विजय मिळवला आहे. पारशिवनी येथे भाजपाच्या प्रमीला कुंभलकर यांना २४३८ तर काँग्रेसच्या सुनीता डोमकी २२२९ मते मिळाली. येथे भाजपाचे ११ उमेदवार विजय झाले असले तरी भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी बावनकुळे यांना केवळ १७८५ मते मिळाली. नागपूर जिल्ह्यात आमदार बच्चु कडु यांच्या ‘प्रहार’ने प्रथमच निवडणूक रिंगणात प्रवेश केला. प्रहारच्या अध्यक्षपदाच्या उमदेवार लिना वाघाडे यांना केवळ ५८५ मतांवरच समाधान मानावे लागले. येथे भाजपाला ११, शिवसेनेला ४ तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे.

पारशिवनी येथील निवडणूक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी येथे मोठया प्रमाणात सभाही घेतल्या. यात त्यांना ११ जागी विजय मिळविता आला असला तरी त्याचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहला. काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सुध्दा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना दोन जागाच मिळाल्या आहेत. शिवसेनेकडुन माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी धुरा सांभाळली होती. त्यांना केवळ चार जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपद मिळविण्यात यश आले आहे.

वानडोंगरी येथे भाजपाचे विद्यमान आमदार समीर मेघे व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रमेश बंग यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतू भाजपाने येथे एकतर्फी विजय मिळविल्याने सर्वच राजकीय अंदाज फोल ठरविले. भाजपाच्या वर्षा शहाकार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवार शिला डाहाके यांना २७०१ मतांनी पराभूत केले. शिवसेनेच्या रचना कन्हेर या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. पक्षीय बलाबल लक्षात घेता २१ जागेपैकी भाजपाला १९, राष्ट्रवादी १ तर अपक्ष १ ठिकाणी विजयी झाले आहे. येथे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढत तरी काँग्रेसचा एक गटाने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविले होते. याचाच फटका राष्ट्रवादीला बसला. हिंगणा येथील निवडणूक सुरुवातीपासुनच चर्चेत होती.

हिंगणा येथील निवडणुक सुरुवातीपासुनच चर्चेत होती. सुरुवातीला उमेदवारी अर्जावरुन तर नंतर मतदानाच्या दिवशी व्होटींग मशीन मधील घोळ यामुळे याची चर्चा होती. राष्ट्रवादी व काँग्रेसने लोकशाही पध्दतीने ही निवडणूक झाली नसल्याचा आरोप केला आहे. एकंदरीत जिल्ह्यातील या दोन निकालांमुळे भाजप व शिवसेनेचे मनोबल वाढले आहे.