
सामना प्रतिनिधी । नगर
महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतांनाच आता राजकीय कार्यकर्त्यांकडून कुरघोड्यांना सुरुवात झाली आहे. यातूनच सावेडी उपनगर भागातील श्रमिकनगर येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेला फ्लेक्स अज्ञातांकडून फाडण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे.
प्रचारासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रचार फेर्या, सभांवर जोर दिला जात आहे. परस्पर विरोधी उमेदवारांकडून डावपेच आखले जात आहेत. यातूनच किरकोळ वादाचे प्रकारही घडत आहेत. मात्र, सावेडी उपनगरातील श्रमिकनगर येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या संपर्क कार्यालयासमोर लावलेला फ्लेक्स रात्रीतून फाडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.2) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवसेना कार्यकर्ते विशाल बहिरु धायक यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































