
एकीकडे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूरांची रेल्वेच्या स्पेशल गाड्यांमधून पाठवणूक करण्याचे काम सुरू असताना तिकडे एसटी महामंडळाने कोणताही गाजावाजा न करता उत्तर प्रदेशच्या उन्नावमधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरूपपणे पोहचविले आहे. शिवाय तेथे अडकलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना देखील नगरच्या पारनेर येथे आणून एसटी महामंडळाने मोठी कामगिरी बजावली आहे. हे विशेष म्हणजे हे अदानप्रदान उत्तर प्रदेश किंवा महाराष्ट्रात न होता मध्य प्रदेशातील राजगड येथे घडले!
राजस्थानच्या कोटा येथील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटीने आपल्या गाड्या सोडल्याची घटना ताजी असतानाच आता एसटीने आपल्या सामाजिक बांधिलकीचे आणखी एक उदाहरण दिले आहे. नगरच्या पारनेर तालुक्यातील मुक्काम पोस्ट टाकळीच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे नववीत शिकणाऱ्या 23 विद्यार्थ्यांना (15 मुले आणि 8 मुली) उत्तर प्रदेशातील त्यांच्या पालकांकडे सुखरूपपणे पाठविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाच्या खांद्यावर पडली. तर उ.प्र.च्या उन्नाव येथील राजीवपुरम येथे याच संस्थेच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील 15 विद्यार्थ्यांना (8 मुले आणि 8 मुली) परत सुखरूपपणे परत आणायचे होते. 3 मे रोजी दोन्ही राज्यांतील बसेस आपआपल्या राज्यातून प्रवासाला निघाल्या. त्यानंतर ही शिवशाही बस नगर, नाशिक, धुळे, बदावणी ( म.प्र.), खरगोने, इंदूर, देवस अशा रस्त्याने मध्य प्रदेशातील राजगड येथे अखेर पोहचली. राजगड येथील काचनरीयाच्या जवाहर नवोदय विद्यालयात दोन्ही राज्यांतील या विद्यार्थ्यांचे अदानप्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यांना मास्क, सॅनिटायजर वगैरे पुरविण्यात येऊन सर्व नियम पाळून दोन राज्यांतील विद्यार्थ्यांचे अदानप्रदान करण्यात आल्याचे शेवगाव आगारातील अधिकारी विजय गिते यांनी सांगितले.


























































