कोण सोडून गेला त्याची पर्वा करु नका, आडवा आला तर आडवा करुन पुढे जा – भास्कर जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहे. शिवसेनाप्रमुखांचे ज्येष्ठ प्रधान मंडळ होते. त्यामध्येही कोकणचीच नेतेमंडळी होती. आजही कोकणच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. आज आपल्या सोबत कोणी आला नाही किंवा कोण सोडून गेला तर त्याची पर्वा करु नका. काही फरक पडणार नाही. अशावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वचन वापरा. आलास तर सोबत, नाही आलास तर तुला वळसा घालून आणि आडवा आलास तर तुला आडवा करुन पुढे जाईन. अशा पध्दतीने तुम्ही कार्यरत राहा, असे मार्गदर्शन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते रत्नागिरीतील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारीणीत बोलत होते.

शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले की, कार्यकर्त्यांचे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात जे पदाधिकारी घरदार सोडून संघटनेसाठी काम करतात. अशांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी. त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. दुसऱ्या टप्प्यातील कार्यकर्त्यांना खूप काही करायचे असते, पण त्यांना अडचणी येतात. अशा कार्यकर्त्यांना समजून घ्यायला पाहिजे. तिसऱ्या टप्प्यातील कार्यकर्ते पदे घेऊन बसतात. काही काम करत नाहीत. त्यांच्या डोक्यात हवा गेलेली असते. तो फुगा टाचणीने फोडावा लागतो. अशावेळी तो कार्यकर्ता गेला तर त्याची पर्वा करु नका. कारण शिवसेना ही इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे. सतत प्रवाहात राहणारा हा पक्ष आहे. त्यामुळे तुम्हीही कार्यरत राहा असा सल्ला त्यांनी दिला.

मुरजीची बुर्जी होणार हे त्यांना आधीच कळलं होतं

अंधेरी विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवायला हवी होती. मग भाजपाला कळलं असतं शिवसेनेच्या मशालीचे तेज काय आहे. मुरजीची बुर्जी होणार हे त्यांना आधीच कळल्यामुळे त्यांनी आधीच पळ काढला आणि नोटाला मतदान केले. जर मुरजीनी निवडणूक लढवली असती तर भाजपाला नोटाएवढीच साडेबारा हजार मते मिळाली असती असे भास्कर जाधव म्हणाले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 2014 साली शिवसेनेने भाजपाविरुद्ध लढताना आपला पहिला उमेदवार निवडून आणला. शिवसेनेने स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. पुन्हा एकदा आपला हक्काचा उमेदवार रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडून आणूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.