
सामना ऑनलाईन | लंडन
पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकप 2019 मध्ये पाकिस्तानने अखेरच्या लढतीत बांग्लादेशचा 94 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर मलिकने निवृत्तीची घोषणा केली.
वर्ल्डकपमध्ये सुमार कामगिरी
यंदाच्या वर्ल्डकप मध्ये शोएब मलिकची कामगिरी सुमार राहिली. पाकिस्तान संघाकडून मलिकला यंदा फक्त 3 लढती खेळायला मिळाल्या. यात त्याने फक्त 8 धावा केल्याने संघाचे द्वार त्याच्यासाठी बंद झाले. मलिकच्या जागी हरिस सोहेल याला संघात जागा मिळाली आणि त्याने दमदार कामगिरी केल्याने मलिकला पुन्हा संघात स्थान देण्यात आले नाही. त्याने अखेरचा सामना हिंदुस्थान विरुद्ध खेळला आणि यात तो शून्यावर बाद झाला.
एक दिवसीय क्रिकेट आधी मलिकने 2015 रोजी कसोटी क्रिकेट मधून संन्यास घेतला होता. आता तो पाकिस्तानसाठी फक्त टी-20 लढतीत खेळताना दिसेल. 2020 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता आहे.



























































