जव्हारमध्ये गरीबांचा तांदूळ काळ्या बाजारात, गोरगरीबांचा घास हिरावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीबांना स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी रेशन दुकानांची निर्मिती सरकारने केली खरी, पण ही दुकाने गरीबांसाठी आहेत की व्यापाऱ्यांसाठी असा प्रश्न पडला आहे. जव्हारमध्ये तांदळाचा काळाबाजार सध्या जोरात सुरू असून रेशनचे धान्य थेट व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाठवले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शिधावाटप विभागाने स्थापन केलेली भरारी पथके आहेत कुठे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

जव्हार तालुक्यात अवैध रेशन तांदळाच्या व्यवसायाने कळस गाठला आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंग यांनी धाड टाकून अवैधरीत्या वाहतूक करणारा तांदळाचा ट्रक जप्त केला होता. मात्र तेव्हापासून आजतागायत एकही कारवाई झाली नाही. मागील महिन्याभरापासून निवडणुकीच्या कालावधीमध्ये काळाबाजाराने तर कळस गाठला आहे. रेशन धान्याचे वितरण होताच अवैद्य तांदळाची तस्करी होत आहे. या तस्करीला तहसीलदार कार्यालयाचे अभय असल्याची चर्चा आहे. या तांदळाचा एकत्र साठा करून काळाबाजारात पाठविला जातो. या गोरखधंद्यामध्ये लाखोंची उलाढाल महिन्याकाठी होत असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी जव्हार तहसीलदार लता धोत्रे यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जव्हार तालुक्यात प्रत्येक कुटुंबाला एका ठरावीक एककाप्रमाणे रास्त भाव धान्य दुकानातून धान्य वितरित करण्यात येते. हे धान्य काही दलाल सरकारीबाबूंच्या मदतीने काळाबाजारात विक्री करत असल्याची तक्रार आली आहे. याबाबत पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून हा प्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.

इम्रान कोतवाल, (उपाध्यक्ष, पालघर जिल्हा संभाजी ब्रिगेड)