अत्यावश्यक सेवेतील वस्तू घरपोच देण्यासाठी कराडच्या विक्रेत्यांना हवेत 300 पास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आणखीन वाढवण्यात आले असून कडक बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना किराणामाल व इतर अत्यावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात, यासाठी परवानाधारक विक्रेत्यांना नगरपालिकेकडून भाजी, किराणा, मटन, मच्छी इत्यादी साहित्य घरपोच देण्याचा पास नगरपालिकेकडून देण्यात येत आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 300 विक्रेत्यांनी पाससाठी आवश्यक असणारे अर्ज केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला विक्री यांच्यासह सर्व खाद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र, भाजी, किराणा, मटन, मच्छी या सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा पास विक्रेत्याकडे आवश्यक असल्याने हे पास नगरपालिकेतील देण्यात येत आहेत. किराणा दुकानदार व कामगार असे दोन पास प्रत्येक अत्यावश्यक साहित्य देणार्‍यांना देण्यात येणार आहेत. यासाठी शॉप अ‍ॅक्ट लायसन्स किंवा एखाद्या शासकीय योजनेतून अथवा बँकेतून व्यवसायासाठी कर्ज घेतल्याचा पुरावा, कोरोना तपासणी अहवाल, ओळखीचा पुरावा, दुकानदार व कामगार यांचे तीन फोटो असे कागदपत्र असणार्‍या विक्रेत्यास नगरपालिकेकडून घरपोच साहित्यचा पास देण्यात येणार आहे.

पास नेण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होऊ नये व सोशल डिस्टंसिंग रहावे यासाठी पालिकेच्या आवारात मंडप घालण्यात आला आहे. एका दुकानदारास दुकानदार व कामगार असे दोन पास देण्यात येत आहेत. प्रत्येक विक्रेत्याकडून तपासणी अहवाल असणे बंधनकारक आहे. सकाळी 7 ते 11या वेळेतच साहित्य घरपोच करता येणार आहे. ज्या विक्रेत्यांना साहित्य घरपोच करावयाचे आहे त्यांनी नगरपालिकेत अर्ज घेऊन भरून देणे व त्याबरोबर आवश्यक कागदपत्र आणावे, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.