दखल- सहज सोपं लिखाण

>> श्रद्धा देशपांडे 

 

कधी कधी एखादं पुस्तक आपल्याला असं मिळून जातं की ते फार ढोल पिटवीत किंवा  गाजावाजा करीत आलेले नसते, तर उलट पावलाचा आवाज न करता येतं. मात्र त्यातील शब्दाची मधुरता आणि लेखनातील चिंतनशीलता या दोन्हीचा संगम होऊन हे पुस्तक आपल्यालाच अलगद विचारांच्या झुल्यावर बसवते. असे पुस्तक म्हणजे ‘मूलाधार’. कवी मनाच्या लाघवी स्वभावाच्या कवयित्री कविता मेहेंदळे यांचे हे पुस्तक. त्यांच्या मूलाधार या पुस्तकामुळे त्यांच्यातील कुतूहल, समदृष्टी आणि चिकित्सक वृत्ती हे सहजधर्म अधिक ठळकपणे जाणवतात.

‘मधुश्री प्रकाशित’ या पुस्तकात सोळा विषयांची लेखमाला आहे.  यातला पहिला शीर्षक लेख मूलाधार यात अगदी मुळाशी जाऊन लेखिकेने मांडलेला स्पष्ट आणि स्वच्छ विचार पटतो आणि मग पुस्तक आपला कब्जा घ्यायला लागते. यातील ‘वय वेडं असतं’ हा लेख मानवी स्वभावाच्या तळाशी नेणारा आहे, तर पृथ्वीच्या प्रेमात पडावं असा ‘वसुंधरा’ हा लेख सूक्ष्म बारकावे टिपणारा आहे. ‘सौंदर्याची परिभाषा’ आणि ‘ऋतू वसंत’ हे दोन लेख निसर्गात विचारांचे सूर मारायला आपल्याला उद्युक्त करतात.

लालित्यपूर्ण लेखनाची प्रतीती ‘प्रवाह’ हा संवादरूपी लेख वाचताना येते. ‘खरं सांगायचं तर’ आणि  ‘कोर्टाचा निकाल’ या लेखात भोवतालच्या समाजमनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न आहे. ‘एका तळ्यात होती…’ या लेखाच्या निमित्ताने गदिमांच्या शब्दाशब्दातील अर्थ, आशाताई यांचे स्मरण आणि या गाण्याच्या संदर्भात लेखिकेची आठवण  याची घट्ट वीण घालून अतिशय प्रभावी लेख तयार झाला आहे..

लेखिकेने मांडलेले विचार गहन असले तरी समजून सांगण्याची शैली अतिशय साधी सोपी आहे. त्यामुळे वाचताना माहितीचा धागा हाती लागल्याचा आनंद मिळतो.

 

शब्दांकन – शुभांगी बागडे