
लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीजवळच्या महरोली जंगलात टाकणाऱया आफताब पूनावाला याच्याविरोधात आता अत्यंत ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. महरोलीच्या जंगलात सापडलेली हाडे ही श्रद्धाचीच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. वडिलांच्या डीएनएशी श्रद्धाचे डीएनए जुळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनंतर उघडकीला आलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. सहा महिन्यांनंतर श्रद्धाचे 35 तुकडे गोळा करून आफताब पुनावालाच्या विरोधात पुराव्यांची जुळवाजुळव करणे अत्यंत आव्हानात्मक काम होते. त्याचबरोबर पोलिसांना उलटसुलट माहिती देत पोलिसांच्या तपासात अडथळा आणण्याचा आणि दिशाभूल करण्याचे कामही आफताब करत होता. सराईत गुन्हेगारांप्रमाणे अत्यंत चलाख असलेल्या आफताबला बोलते करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला त्याची पॉलिग्राफ चाचणी आणि त्यानंतर नार्को चाचणी केली. कोर्टात या दोन्ही चाचण्यांतून पुढे आलेल्या जबाबाला पुरावा म्हणता येईल एवढे महत्त्व कायद्याच्या चौकटीत बसत नव्हते. मात्र, आता वडिलांच्या डीएनएशी श्रद्धाचा डीएनए जुळल्यामुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा हाती लागला आहे. श्रद्धाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आफताबला 12 नोव्हेंबरला अटक केली होती.
पॉलिग्राफ, नार्कोतही दिली होती हत्येची कबुली
अटक झाल्यापासून दरदिवशी पोलीस तपासात आफताब उलटसुलट जबाब नोंदवत पोलिसांची दिशाभूल करत होता. त्यामुळे पोलिसांना न्यायालयाकडून परवानगी घेत त्याची पॉलिग्रॉफ आणि नार्को चाचणी केली. यात त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे कबूल केले होते. दिल्लीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात झालेल्या पॉलिग्रॉफ आणि नार्को चाचणीत त्याने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती.
























































