
वसई येथील श्रमिक महिला विकास संघातर्फे पोळी भाजी केंद्र हा उपक्रम राबवला जात आहे. सध्या केंद्राच्या माध्यमातून 150 महिलांना रोजगार मिळत आहे. केवळ स्वयंरोजगारच नव्हे तर महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणाचे, त्यांच्यामध्ये आत्मभान जागवण्याचे काम केले जात आहे.
1991 साली इंदूताई बर्वे, जयश्री सामंत, उषा मणेरीकर, ललिता बर्वे अशा चळवळीतील चार महिलांनी श्रमिक महिला विकास संघाची स्थापना केली. त्यांनी वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात पोळी भाजी केंद्र सुरू केले. केंद्रातील जेवण रुचकर, अगदी घरगुती होतं. तेही अगदी स्वस्त दरात मिळत होतं. त्यामुळे केंद्राची लोकप्रियता वाढली. त्यानंतर गरजू महिलांपर्यंत पोचण्यासाठी वसई, नालासोपाऱयात सहा शाखा सुरू करण्यात आल्या. श्रमिक महिला विकास संघाच्या अध्यक्षा उषा मणेरीकर, उपाध्यक्षा भारती ठाकूर, खजिनदार शुभदा कोठावळे, सचिव जयश्री सामंत, सभासद अनिता खानोलकर, रूपाली कारखानीस, गीता पाटकर या सात जणी विश्वस्त मंडळावर आहेत. 97 वर्षांच्या इंदूताई बर्वेच्या मार्गदर्शनाखाली पोळी भाजी केंद्राचा उपक्रम सुरू आहे. इथे 30 रुपयांत रुचकर पोळी भाजी मिळते.
केवळ आर्थिकदृष्टीने नव्हे तर शारीरिक, सामाजिक, कौटुंबिकदृष्टय़ा महिलेला उभं करणे, हे खरे सक्षमीकरण. श्रमिक महिला विकास संघाच्या महिलेच्या हातात मानधन कमी मिळत असले तरी तिच्या भविष्याची तरतूद तिथे होते. सभासद महिलेच्या मुलांचा एसएससीपर्यंतचा भार संस्था उचलते. मुलांना गणेश, पुस्तके, महिलांची आरोग्य तपासणी, योग्य उपचार, पीएफ पेन्शन योजना राबवल्या जातात. वर्षाला सांस्कृतिक सहल आयोजित केली जाते. केवळ प्रेक्षणीय स्थळे न दाखवता, सहलींतून वैचारिक दिशा देण्याचे काम केले जाते. आपल्यापलीकडे जाऊन काम करणारे लोक आणि संस्था सहलींच्या माध्यमातून दाखवल्या जातात
महिलांच्या हातात पैसा किती देतो, त्यापेक्षा त्यांना सुविधा काय देऊ शकतो, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमची ट्रस्ट आहे. पोळी भाजी केंद्र नफ्याविना चालणारा उपक्रम आहे. आमच्या जमा पुंजीतून आम्ही महिलांच्या कल्याणासाठी झटतोय. अशा वेळी एक हॉटेल किंवा रेस्टॉरंट म्हणून आमच्याकडे बघू नये, अन्यथा व्यवस्थेतून आम्ही फेकले जाऊ. आमचे काम अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहे. सर्व संस्थांना एका तागडीत तोलू नये. त्या त्या संस्थांचा आढावा घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
जयश्री सामंत, सचिव






























































