।। श्री शंकरगाथा ।। 68

72

मला ‘ज्ञान’ हवे आहे!

आयुष्यातील पहिलावहिला, अवर्णनीय आणि अद्भूत अनुभव घेतल्यानंतर जी. के. प्रधान म्हणाले, ‘मी एकाएकी समाधीवस्थेत गेलो. जणू काही मी माझ्या शरीरातून बाहेर निघालो. विविध प्रकारचे सुमधुर नाद अन् सुगंध मला त्या अवस्थेत अनुभवावयास मिळाले. मी भानावर आलो तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. जवळपास सात तास मी त्या अवस्थेत होतो. महाराज माझ्याकडे पाहात हसत होते. मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवले आणि म्हणालो, ‘मला आपल्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. आजपासून आपणच माझे गुरू आहात!’ तेव्हा श्रीमहाराज मला म्हणाले, ‘अरे, तू खरे तर अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा शिष्य आहेस! तो म्हातारा माझ्या पाठीमागे सारखा तगादा लावून माझ्याकडून हे सर्व करून घेतोय.’ अशा रीतीने अल्पावधीतच श्रीमहाराज आणि प्रधान यांचा स्नेहबंध जुळून आला व घट्ट झाला.

एकदा जी. के. प्रधान नॉर्वेहून जर्मनीस येत असताना विमानात बिघाड झाला. प्रवाशांनी जगण्याची आशा सोडली होती. तेव्हा प्रधानांनी श्रीमहाराजांचे स्मरण केले आणि विमान सुरक्षित उतरते झाले. हा चमत्कार कसा झाला हे पायलटलादेखील समजले नाही. पुढे हिंदुस्थानात परतल्यावर प्रधान श्रीमहाराजांना भेटले तेव्हा श्रीमहाराजांनी त्यांना विचारले, ‘काय रे, त्या दिवशी विमानात घाबरला होतास नाही का?’ त्यांचे बोलणे ऐकून प्रधान आश्चर्यचकित झाले तेव्हा श्रीमहाराज हसत हसत म्हणाले, ‘अरे, तेव्हा मीच तुझ्या शेजारी बसलो होतो.’

प्रधान काही काळ इंग्लंड येथे एका वृद्ध बाईच्या घरी भाडय़ाने राहात असत. त्याच सुमारास, त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त कानी येताच प्रधान यांना अतिशय दुःख झाले. वडिलांची शेवटची भेट होऊ शकली नाही म्हणून ते खिन्न अवस्थेत खोलीत एकटेच बसले असताना तिथे श्रीमहाराज प्रकट झाले. त्यांना पाहून प्रधानांना दुःखाचा उमाळा आला. श्रीमहाराजांच्या मांडीवर डोके ठेवून ते शोक करू लागले तेव्हा त्यांचे सांत्वन करीत श्रीमहाराज म्हणाले, ‘चल माझ्यासोबत!’ अन् प्रधानांना घेऊन ते गिरनार पर्वतावर आले आणि तेथे त्यांना श्रीमच्छिंद्रनाथ व श्रीगोरखनाथांचे दर्शन घडवले. प्रधानांनी त्या योगीसत्पुरुषांच्या चरणांवर मस्तक ठेवले तोच त्यांना श्रीदत्तप्रभूंचे दर्शनही घडले. प्रधान लंडनला परतले. पुढे काही वेळाने घरमालकीण त्यांना म्हणाली, ‘काय रे, तू कुठे गेला होतास?’ प्रधानांना तिच्या बोलण्याचा रोख कळला नाही तेव्हा ती सांगती झाली, ‘तुझ्या बुटांच्या तळाला लागलेली लाल माती इथली नाही, हिंदुस्थानातील आहे. मग तुझ्या बुटांसोबत आत्ता ती इथे कशी आली?’ प्रधान चपापले अन् गप्प राहिले. त्या दत्तदर्शनाचा ठसा प्रधानांच्या मनावर इतका खोलवर उमटला होता की त्यांनी एका चित्रकाराला त्या दिव्य दत्तदर्शनाची कल्पना देऊन त्याच्याकडून श्रीदत्तात्रेयांचे चित्र काढून घेतले.

नास्तिकपणाकडे झुकत असलेल्या प्रधानांना श्रीमहाराजांनी आस्तिकतेच्या मागार्वर आणले. ते नित्य नियमाने पूजा करीत, ज्ञानेश्वरी- गुरुचरित्राचे पारायण करीत, ‘योग वसिष्ठ’ हा त्यांच्या नित्यवाचनात असलेला ग्रंथ होता. प्रधान ज्ञानमार्गी होते. श्रीमहाराजांपाशी ते बौद्धिक वाद घालीत असत, मात्र एकदा का बुद्धीला पटले की श्रीमहाराजांनी केलेल्या उपदेशानुसार आचरण करण्यात ते कसूर करीत नसत.

श्रीमहाराज आनंदात असतील तर काय करतील याची कल्पनाही कुणाला येत नसे. एके दिवशी श्रीमहाराज प्रधानांना म्हणाले, ‘बाबा, तू जे मागशील ते मी तुला आज देणार आहे. सत्ता, संपत्ती, दौलत जे हवे असेल ते माग.’ प्रधान म्हणाले, ‘पाहा बरं! मी मागितल्यावर मग म्हणाल, हे नको, यापेक्षा वेगळे माग.’ श्रीमहाराज म्हणाले, ‘काही हरकत नाही. मी एकदा तुला देईन म्हटले ना! मग नक्कीच देईन’ तेव्हा प्रधान म्हणाले, ‘मला ज्ञान द्या.’ हे ऐकताच श्रीमहाराज एकदम ओरडले अन् म्हणाले, ‘बेटा, तू तर माझ्या लंगोटीला हात घातलास. हरकत नाही. तथास्तु.’ प्रधान नाथसंप्रदायाचे चाहते होते. ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या दर्शनाला गेलो असताना श्रीमहाराजांनी ‘अल्लख’ असे पुकारताच त्या दोन्ही भावंडांनी प्रधानांना प्रत्यक्ष दर्शन दिले यावरून प्रधानांचा अधिकार किती होता हे समजून येते.

चैतन्यस्वरूप ([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या