
फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभर प्रसिद्ध असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाविकांकडून पैसे घेऊन व्हीआयपी दर्शन घडविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. मंदिराबाहेर असलेले फुलविक्रेते आणि मंदिराचे कर्मचारी यांचे एक रॅकेट होते जे भाविकांकडे झटपट दर्शनासाठी पैशांची मागणी करत होते असा आरोप करण्यात आला आहे. या गैरप्रकाराचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. यामध्ये फुल विक्रेत्याने 3 हजार रुपयांच्या बदल्यात थेट गाभाऱ्यातून दर्शन घडविण्याचे मान्य केले होते. पैसे दिल्यानंतर त्याने हे दर्शन घडवून आणले होते. दर्शन घडविण्यासाठी फुलविक्रेत्याला मंदिरातील कर्मचाऱ्यांचीही साथ असल्याचे दिसून आले होते.
गर्दी जास्त असली की मंदिराबाहेरचे फुलविक्रेते भाविकांना झटपट दर्शन हवे आहे का असे विचारतात. होकार दिल्यास त्यांच्याकडून पैसे घेऊन ते भाविकांना व्हीआयपी दर्शन घडवत असल्याचे निदर्शनास आले आहे. मंदीर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सखोल चौकशी सुरु केली होती. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही दृश्ये तपासली असता त्यांना दिसून आले की कोणतीही पावती किंवा नोंदणी न करता भाविक बनून स्टिंग ऑपरेशन करणाऱ्यांना कशा पध्दतीने मंदिरात देण्यात आला. या सीसीटीव्हीमुळे रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटण्यास मदत झाली होती.
मंदीर समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये दलाल स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या भाविकांसोबत स्पष्टपणे दिसत आहे. सायंकाळी 6 च्या सुमारास स्टिंग ऑपरेशन करणारे सिध्दी गेट उघडल्यानंतर मंदीर परिसरात आले. यानंतर जनसंपर्क कार्यालयाच्या दिशेने गेल्यावर तिथे त्यांना संतोष दळवी नावाचे शिपाई भेटले. दळवी यांनी कोणाला तरी फोन लावला आणि कोणतीही नोंदणी न करता साडेसहाच्या सुमारास या भाविकांना मंदिरात नेले होते. सीसीटीव्ही दृश्ये पाहिल्यानंतर मंदीर ट्रस्टचे व्यवस्थापक संजीव पवार यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे दादर पोलिसांनी तीन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे गांभिर्य पाहता दादर पालीस स्टेशनचे विरष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड म्हणाले,”मंदीर ट्रस्टने सर्व पुरावे सादर केले आहेत. पुराव्यांचे आधारे तीन अज्ञात व्यक्तिंविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अधिक तपास करत असून संशयितांचा शोध अद्याप लागलेला नाही. इंग्रजी वर्तमानपत्र मिड-डे ने हे स्टिंग ऑपरेशन केले होते आणि गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त याच इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.

























































