
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या हिंदुस्थान संघात पुनरागमनाला मंजुरी मिळाली आहे. मात्र त्याचे प्रत्यक्ष मैदानात उतरणे पूर्ण फिटनेसवर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनाच्या टप्प्यात असलेला तिलक वर्मा पहिल्या तीन आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांतून बाहेर पडला आहे.
श्रेयस अय्यरचा 15 सदस्यीय संघात समावेश आधीच करण्यात आला होता, पण त्याचे स्थान फिटनेस चाचणीवर ठरवण्यात येणार होते. विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दमदार कामगिरी करत त्याने आपली तयारी सिद्ध केली असून तो शुक्रवारी हिंदुस्थान संघात सहभागी होणार आहे. वडोदऱयात होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या अवघ्या दोन दिवस आधी तो संघासोबत सरावाला उतरेल.
ऑस्ट्रेलिया दौऱयावर 25 ऑक्टोबर रोजी बरगडय़ांना दुखापत झाल्यानंतर श्रेयस प्रथमच हिंदुस्थान संघात परतत आहे. या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेला मुकला होता. मात्र आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून 82 आणि 45 धावांच्या खेळी करत त्याने पुनरागमनासाठी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. शार्दुल ठाकूरच्या अनुपस्थितीत त्याने मुंबईचे नेतृत्वही यशस्वीपणे सांभाळले.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर तिलक वर्मा सध्या विश्रांतीवर आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो शुक्रवारी हैदराबादला परतणार आहे. त्याची प्रकृती स्थिर असून पूर्णपणे बरा झाल्यानंतरच तो आपला सराव सुरू करेल. सरावानंतरच्या प्रगतीनुसारच अखेरच्या दोन टी-20 सामन्यांतील त्याच्या सहभागावर निर्णय घेतला जाणार आहे.
हिंदुस्थानच्या एकदिवसीय संघातील बहुतांश खेळाडू 7 जानेवारीलाच वडोदऱयात दाखल झाले आहेत. तब्बल 15 वर्षांनंतर वडोदऱयात आंतरराष्ट्रीय सामना रंगणार आहे.
हिंदुस्थानचा एकदिवसीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैसवाल.
































































