
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या बहुचर्चित बनावट अॅपद्वारे भाविकांची फसवणूकप्रकरणी सायबर पोलिसांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोमवारी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी शनैश्वर देवस्थान प्रशासकीय विभागातील सर्व आस्थापनाची चार ते पाच तास तपासणी केली. तपासाची चक्रे वेगाने फिरत असल्याने मंदिर प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
तपासणी पथकातील पाच ते सहा पोलीस अधिकाऱ्यांनी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांच्या कार्यालयात देणगी पावती, पुस्तक ऑनलाइन रकमा नोंदी, नोकरभरती तसेच तेल आदी विभागातील कारभाराची चौकशी करून कागदपत्रे ताब्यात घेतली. सीसीटीव्ही फुटेज तसेच तेलाची स्टोअर टँक, बर्फी प्रसाद स्टॉल, सीसीटीव्ही कंट्रोल रूम आदी विभागाची चौकशी करून पाहणी केली. दररोज भाविकांची संख्या यातून देवस्थान राबवत असलेल्या उपक्रमातून मिळणारे उत्पन्न याची पोलिसांनी झाडाझडती घेतली.
ऑनलाइन बनावट अॅपविरोधात देवस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले व सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी फिर्याद देण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसांनीच फिर्याद देऊन अज्ञात अॅपधारक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर लगेच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सायबर पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेदंम यांनी मंदिर परिसरातील सर्व आस्थापनाची चौकशी केली.
दरम्यान, देवस्थान कर्मचारी, अधिकारी व विश्वस्तांचे बँक अकाऊंट नंबर व स्टेटमेंट पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर देवस्थानचे विश्वस्त व अध्यक्ष नॉट रिचेबल असल्याने याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
विश्वस्तांना नोटिसा का?
शनैश्वर देवस्थान अॅप घोटाळा व नोकर भरती गैरव्यवहार यासंदर्भात अहिल्यानगरचे सहायक धर्मादाय आयुक्तांनी विश्वस्तांना नोटिसा बजावल्या असून, 18 जुलै रोजी कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे, असे नोटीसमध्ये म्हटल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे.