
ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणारी… हिंदुस्थानातील बॅडमिंटनला नव्या उंचीवर नेणारी… अर्जुन, पद्मश्री, खेलरत्न, पद्मभूषण या मानाच्या पुरस्काराची मानकरी… अन् असंख्य मुलींसाठी प्रेरणा ठरणारी… हरयाणाच्या 31 वर्षीय सायना नेहवाल हिची ही सक्सेसफुल स्टोरी. या दिग्गज बॅडमिंटनपटूंची संघर्षकथा आता रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
मराठमोळे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचा ‘सायना’ हा चित्रपट 26 मार्च रोजी सिनेमागृहांत झळकणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे या चित्रपटात सायना नेहवालचा रोल साकारणारी अभिनेत्री परिणिती चोप्रा हिला बॅडमिंटन या खेळाचे मार्गदर्शन ठाणेकरांनी केले आहे हे विशेष. ठाणे महापालिका सय्यद मोदी बॅडमिंटन ऍकॅडमीचे सर्वेसर्वा श्रीकांत वाड तसेच माजी बॅडमिंटनपटू इशान नक्वी यांचे मोलाचे सहकार्य यावेळी ‘सायना’ चित्रपटाला लाभले आहे. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ने श्रीकांत वाड व इशान नक्वी यांच्याशी संवाद साधताना ‘सायना’ सिनेमाशी निगडित बाबींवर प्रकाशझोत टाकला.
परिणितीची प्रचंड मेहनत
परिणिती चोप्रा हिने याआधी बॅडमिंटन हा खेळ खेळला नव्हता. त्यामुळे तिला या खेळाचे मार्गदर्शन देताना कठोर परिश्रम घ्यावे लागले. पण परिणिती चोप्रा हिनेही स्वतःहून प्रचंड मेहतन केली. खंडू रांगणेकर हॉलमध्ये मी तिला या खेळाबाबत मार्गदर्शन केले. सायनाचा कोर्टवरचा स्टान्स, सर्व्हिस करताना ती कशी उभी राहते, रॅकेटचा स्विंग कसा घ्यायचा, एल्बोचा वापर कसा करायचा ही माहिती दिली, असे श्रीकांत वाड यांनी सांगितले.
इशान नक्वीला या सिनेमाबाबत तसेच परिणिती चोप्राबाबत विचारले असता तो म्हणाला, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला परिणितीसोबत वेळ घालवता आला. अमोल गुप्ते व परिणितीसह सिनेमाशी संबंधित सर्वच व्यक्ती कुटुंबाप्रमाणे एकत्र राहत होते. वयाच्या 24 वर्षांपर्यंत अव्वल दर्जाचे बॅडमिंटन खेळलोय, पण दुखापतीमुळे मला या खेळाला सोडावे लागले. आता म्युझिकशी संबंधित काम करीत आहे. माझा हा पहिलाच चित्रपट असला तरी माझ्यावर दडपण नव्हते. यापुढे सिनेमा, वेबसीरिजविषयी प्रस्ताव आल्यास आनंद होईल असेही इशान नक्वी म्हणाला.
…अन् हीरो मिळाला
सायना नेहवाल हिचे तिचा सहकारी पारुपल्ली कश्यप याच्यावर प्रेम होते. सिनेमामध्येही पारुपल्ली कश्यपचा रोल करणारी व्यक्ती हवी होती. अमोल गुप्ते यांनी श्रीकांत वाड यांना याबाबत विचारले. त्यावर श्रीकांत वाड म्हणाले, चांगला बॅडमिंटन खेळणारा, अभिनय व संगीताची आवड असणारा व्यक्ती माझ्याकडे आहे. त्याचे नाव इशान नक्वी आहे. अमोल गुप्ते यांनी त्यानंतर इशान नक्वी याची स्क्रीन टेस्ट केली. ऑडिशन घेतले. अखेर पारुपल्ली कश्यपच्या रोलसाठी त्याची निवड केली आणि ‘सायना’ला हीरो मिळाला.

























































