शिवद्रोही छिंदमसह तीन टोळ्या तडीपार, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांसह संगमनेर आणि केडगावमधील एक अशा तीन गुन्हेगारी टोळ्यांना नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांच्याविरुद्ध नगर शहरात संघटितपणे टोळी तयार करून मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, रक्कम बळजबरीने काढून घेणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना नगर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात सहा, तर कोतवाली पोलीस ठाण्यात एक असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता. अधीक्षक पाटील यांनी त्याला मंजुरी दिली आहे.

घुगे टोळी तीन तालुक्यांतून हद्दपार

संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या घुगे टोळीला संगमनेर, राहुरी आणि राहाता तालुक्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख संदीप भाऊसाहेब घुगे, मारुती सगाजी नगरे, विजय बच्चू डोंगरे, अमोल सोमनाथ डोंगरे, दीपक सोमनाथ डोंगरे आणि शशिकांत ऊर्फ मंगेश शिवाजी नागरे (सर्व रा. मालुंजे, ता. संगमनेर) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वाडेगव्हाणचा सोनवणे दोन वर्षांसाठी तडीपार

पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील अक्षय सुभाष सोनवणे (वय 26) याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पारित केला आहे. बेलवंडी पोलिसांनी सोनवणेला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला पोलीस अधीक्षकांनी मंजुरी दिली आहे. त्याच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

केडगावची जायभाय टोळी हद्दपार

शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या जायभाय टोळीला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख अविनाश विश्वास जायभाय (रा. केडगाव), ऋषिकेश अशोक बडे आणि नितीन ऊर्फ किरण किसन लाडू (दोघे रा. सारसनगर, नगर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. हद्दपारीचा प्रस्ताव भिंगारचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पाठविला होता. त्याला पोलीस अधीक्षकांनी मंजुरी दिली आहे.