
‘भोंग्याच्या आवाजापेक्षा संविधानाचा आवाज मला पवित्र वाटतो. भोंग्याच्या राजकारणामध्ये देवाला अडकवू नका आणि धर्माला बदनाम करू नका. संविधानाची वाटणी आणि फाळणी करू नका. हे आपल्या देशाला परवडणारे नाही,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या विश्वस्तांमार्फत रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, गणपतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि त्याच्या आतील बाजूस पीर दर्गा आहे. या कार्यक्रमाला साहित्यिक श्रीपाल सबनीस उपस्थित होते. ‘असे एकात्मतेचे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. गेल्या 35 वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांनी याचा आदर्श घ्यावा. अशा प्रकारचे प्रयोग राजकीय स्तरावर करावेत. यामुळे राजकारण, धर्मकारण शुद्ध होईल आणि तिरंगा आनंदाने फडकेल,’’ असे श्रीपाल सबनीस यांनी म्हटले.
























































