सेलेब्रिटी चॉइस – आठवणींच्या गोतावळय़ात…

>> संतोष जुवेकर

अभिनयक्षेत्रात आल्यानंतर वाचनाची आवड लागली. आवड म्हणण्यापेक्षाही कुणीतरी सुचवलं म्हणून  कधी वेगळा विषय, वेगळा लेखक म्हणून वाचलेली ही पुस्तकं. हे वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन आहे. मात्र यातही नॉस्टेल्जिया जपणारी, आठवणीत गुंतवून ठेवणारी पुस्तकं वाचायला आवडतात. सुरूवातीच्या काळात वाचलेली मधु मंगेश कर्णिक यांची पुरूषसूक्त, माहीमची खाडी अजूनही पुन्हा वाचायला आवडतात. सध्या मी वाचत असलेलं हृषिकेश गुप्ते यांचं गोठण्यातील गोष्टी हे असंच पुस्तक आहे. त्यातला उस्मान पेडणेकर, फक्या गोलंदाज, जिताडेबाबा या नुसत्या व्यक्ती नाहीत तर त्यांच्यामधून आपलं लहानपण, आपण जगलेला भूतकाळच आठवतो. जुन्या आठवणींच्या गोतावळ्यात घेऊन जाणारी पुस्तकं खूप आवडतात.

या पुस्तकांसोबतच आवडत्या यादीतील पुस्तकं म्हणजे प्रभाकर पेंढारकरांचं रारंगढांग, विश्वास पाटील यांचं झाडाझडती, राधेय आणि अर्थात मिलींद बोकील यांचं शाळा. या चित्रपटात भूमिका केली म्हणून विशेष आवडणारं हे पुस्तक कधीही वाचावं आणि पुन्हा तोच अनुभव घ्यावा इतपं तरल आहे. दुनियादारी, शाळा ही पुस्तकं मनाच्या कोपऱयाला स्पर्श करतात. असेच भावलेले आणि कारुण्याचा अनुभव देणारे लेखक खालिद हुसेन यांची काइट रनर, थाउजंड स्प्लेंडेड सन्स, अनंत सामंत यांचं एम. टी. आयवा मारू ही प्रेम, मत्सर, द्वेष असा भावनांचा मिलाफ दर्शवणारी कादंबरी ही पुस्तकं कायम लक्षात राहतात.

सध्या चर्चेत असलेलं शरद तांदळे यांचं रावण हे पुस्तक वाचतोय. रावण या व्यक्तित्वामागे असलेलं तत्वज्ञान, रावणाचं खलनायकी रूप अशा अनेक प्रश्नांची उत्तरंच जणू या पुस्तकातून आपल्याला मिळतात. हे पुस्तक वाचून रावण नेमका कसा होता याबाबतचा आपला दृष्टिकोन बदलतो पिंवा नाही याहीपेक्षा आपण या वृत्तीबाबत विचार करतो हे खरं. आत्तापर्यंतच्या रावणाबाबतच्या समजाला भेद देणारं असं हे पुस्तक आहे.

अभिनय क्षेत्रासाठी म्हणून वाचावं असं वाटलेलं गॉन विथ द विंड हे पुस्तक फार आवडलं. पहिलं  ऑस्कर मिळालेल्या चित्रपटापासून ते 2005 मध्ये ब्रूकबॅक माउंटन या चित्रपटाला मिळालेल्या ऑस्करपर्यंतच्या चित्रपटांचा आलेख मांडणारं असं हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण यादीत मोडते. हॉलिवूड अभिनेता अॅल्पेचिनो  याचे चरित्र, दादा काsंडके यांचे चरित्र अशी चरित्रपर पुस्तकं वाचायला आवडतातच. ही पुस्तकं मार्गदर्शक ठरतातच.

या वाचनप्रवासात माणसं भेटावी तशी पुस्तकं गवसत गेली मला. प्रत्येक व्यक्ती वेगळी ठरावी तसंच काहीसं… आवडलेली, भावलेली अशी अनेक पुस्तकं आहेत. काही पुस्तकं आठवणीत रमवणारी आहेत तर काही विलक्षण अनुभव देणारी आहेत. आठवणींचा कोलाज मांडणारी ही पुस्तकं आहेत. म्हणूनच पुस्तकांच्या गोतावळ्यात रमायला फार आवडतं.

(शब्दांकन – शुभांगी बागडे)