
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव आता नव्या इनिंगला सुरुवात करतोय. अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित आगामी ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातील ‘मेल्याहून मेल्यागत’ हे सिद्धार्थवर चित्रित केलेले गाणे नुकतेच भेटीला आले आहे. या गाण्याची खासीयत म्हणजे हे गाणे स्वतः सिद्धार्थ जाधवने गायले आहे. वेगवेगळय़ा लूकमध्ये दिसणारा सिद्धार्थ या गाण्याच्या माध्यमातून काहीतरी सांगू पाहात आहे. एखादे सत्य शोधण्यासाठीची त्याची धडपड या गाण्यातून दिसतेय. या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून संगीत पंकज पडघन यांनी दिले आहे. या गाण्याबद्दल संगीतकार पंकज पडघन म्हणतात, “हा एक सांगीतिक चित्रपट असल्याने या गाण्यांच्या माध्यमातूनच कथा पुढे जाते. त्यामुळे या कथानकाला साजेसे आणि दमदार संगीत असणे आवश्यक होते. या चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यात आम्ही काही प्रयोग केले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ प्रथमच गाणे गायला आहे. त्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. इतर गाण्यांप्रमाणे हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’ 15 जुलै रोजी ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

























































