सिद्धिविनायक ते माहीम कॉजवे – पालिकेचा युनिक फुटपाथ! मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र भगत

अद्ययावत आणि सर्व सुविधायुक्त इको टॉयलेट, ठरावीक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि शोभेची झाडे असलेला दर्जेदार पादचारी मार्ग पालिका श्री सिद्धिविनायक मंदिर ते माहीम कॉजवेपर्यंत तयार करणार आहे. या ‘युनिक फुटपाथ’मुळे माहीम दर्गा, चैत्यभूमी, माहीम चर्च आणि सिद्धिविनायकपर्यंत पायी येणाऱया भाविक-मुंबईकरांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे.

दादर-माहीम परिसरातील महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक-मुंबईकर येत असतात. यामध्ये अनेक भाविक श्री सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी आणि माहीम दर्ग्यापर्यंत मोठय़ा श्रद्धेने पायी चालत जातात. मात्र या दादर-माहीम परिसरातील गर्दीमुळे नागरिकांना आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक वेळा वाहनही वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून माहीम कॉजवे ते श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत सर्वसुविधायुक्त ‘युनिक फुटपाथ’ बनवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या कामासाठी पालिका सुमारे साडेसहा कोटींचा खर्च करणार आहे. या फुटपाथच्या कामामुळे संबंधित मार्गावर फेरीवाले, अतिक्रमण हटण्यासही मदत होणार आहे.

असा बनवणार युनिक फुटपाथ
माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर असा 4.5 किमीचा हा ‘युनिक फुटपाथ’ असेल. यामध्ये असलेल्या फुटपाथची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी नूतनीकरण, सुशोभीकरण करण्यात येईल.
या मार्गावरून जाणाऱ्या ज्येष्ठ-दिव्यांग नागरिकांसह सर्वसामान्यांसाठी ठरावीक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.
शिवाय मार्गावर स्वच्छता राखण्यासाठी जागोजागी डस्टबिनही ठेवण्यात येतील. फुटपाथवर आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात येतील.
विशेष म्हणजे फुटपाथवर अनेक ठिकाणी शोभेची झाडे लावण्यात येणार असून शक्य त्या ठिकाणी असणाऱया भिंतीही आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱया चित्रांनी रंगवण्यात येणार असल्यामुळे प्रवास सुखकारक-आनंदी होणार आहे.