बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मराठी भाषा संवर्धनाचा संकल्प केला आहे. शालेय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख, मराठी साहित्याची जाण, मराठी भाषेची जवळीक निर्माण करून देण्याच्या जबाबदारीतून बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने मराठी राजभाषा हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन कsले आहे. ही स्पर्धा मुंबईपुरती मर्यादित आहे.

हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मुलांनी आवडत्या कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातून वहीचे एक पान भरेल एवढा मजकूर आपल्या हस्ताक्षरात लिहावयाचा आहे. वर्तमानपत्रातील मजकुराचे कात्रण वहीच्या डाव्या पानावर चिटकवायचे आहे व आपला मजकूर उजव्या पानावर लिहावयाचा आहे. किमान पंचवीस पाने भरलेली वही स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. 22 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत प्रकाशित होणाऱया कोणत्याही मराठी वर्तमानपत्रातील रोज एक पान याप्रमाणे आपण वहीत लिहू शकता. वर्तमानपत्राचे कात्रण चिकटाविल्यानंतर त्याखाली वर्तमानपत्राचे नाव व दिनांक लिहावा.

अधिकाधिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आले आहे. वही स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 मार्च असून 15/1, बीडीडी चाळ, डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ (पू.), मुंबई – 13 किंवा 402, अभिलाषा बिल्डिंग, प्लॉट नंबर 86, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई 400067. त्याचबरोबर इमारत क्रमांक 4 / 401, गणेश आशीर्वाद को . हौ. सो., भारत नगरसमोर, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) मुंबई 400083. यांपैकी एका पत्त्यावर वही पाठवायची आहे.

पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी तसेच सर्वांसाठी खुला गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक असून 100 उत्तेजनार्थ पारितोषिकेदेखील देण्यात येणार आहेत. वहीवर आपले नाव, पत्ता, इयत्ता आणि मोबाईल नंबर व शाळेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी संपर्क. https://sparkevent.in/hastakshar-spardha-2022 किंवा 81695 53964.