
बाजार नियामक मंडळाने (सेबी) मंजुरी दिल्यानंतर गुंतवणूकदारांना चांदीत गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून 61 हजार रुपये प्रतीकिलो असणारी चांदी 64 हजार रुपये प्रतीकिलोपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे गोल्ड ईटीएफप्रमाणे सिल्वर ईटीएफमधील गुतंवणूकही फायदेशीर ठरणार असून त्यात कमी जोखीम असून चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सेबीने गेल्या वर्षी सिल्वर ईटीएफसाठी नियमावली जारी केली आहे. त्यानंतर देशातील पहिला सिल्वर ईटीएफ नव्या वर्षात लॉन्च झाला. आगामी काळात आणखी काही सिल्वर ईटीएफ आले असून त्यात गुंतवणुकीची चांगली संधी आहे. सिल्वर ईटीएफ गुतंवणुकीचे वाशिष्ट्य म्हणजे यात 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करता येते. म्युचूअल फंड हाऊसकडून ईटीएफसह फंड ऑफ फंडही लॉन्च करण्यात येत आहेत. यात गुंतवणुकीसाठी डीमॅट अकाऊंटची गरज भासत नाही. तसेच यात गुंतवणूक करण्यासाठी एसआय़पीचाही ( सिस्टीमॅटिक इन्सव्हेंसमेटं प्लॅन) पर्याय असतो.
गोल्ड ईटीएफप्रमाणेच सिल्वर ईटीएफमध्येदेखील जोखीम कमी असते. शेअर बाजार आणि म्युचुअल फंडपेक्षा यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. औद्योगिक क्षेत्रात चांदीला वाढती मागणी आहे. देशातील एकूण मागणीच्या सुमारे 50 टक्के मागणी औद्योगिक क्षेत्रातील असते. त्यामुळे यातील गुंतवणूकीतून चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असते.
सिल्वर ईटीएफ आल्याने गुंतवणूकदारांना शेअर बाजारातही चांदीत गुंतवणूक करता येते. इतर शेअरप्रमाणेच ईटीएफ स्टॉकही एनएसई किंवा बीएसईवर लिस्ट केले जातात. सराफा बाजारातून सोन्याचांदीची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते. मात्र, ईटीएफमध्ये 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करता येते. बाजारातून प्रत्यक्ष चांदी खरेदी केल्यास हरवण्याची किंवा चोरीची भीती असते. मात्र, ईटीएफमध्ये तशी भीती नसून चांदीच्या दर्जाबाबतही चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा सुरक्षित पर्याय मानला जात आहे.
आयसीआयसीआय प्रुट्येनशियल असेट मॅनेजमेंट कंपनीने या वर्षाच्या सुरुवातील देशातील पहिला सिल्वर ईटीएफ 5 जानेवारीला लॉन्च केला. गुंतवणुकीसाठी तो 19 जानेवारीपर्यंत खुला होता. त्यानंतर निप्पॉन इंडिया म्युचुअल फंडनेही सिल्वर ईटीएफ आणि फंड ऑफ फंड 13 जानेवारीला आणला होता. त्यात 27 जानेवारीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. त्याचप्रमाणे आदित्य बिरला सन लाईफ म्युचुअल फंडनेही 13 जानेवारीला ईटीएफ लॉन्च केला आहे. कमी जोखीम आणि चागल्या परताव्याची संधी असल्याचे गुंतवणुकीसाठी सिल्वर ईटीएफ चांगला पर्याय मानला जात आहे.




























































