
सामना ऑनलाईन | बँकॉक
हिंदुस्थानच्या पी व्ही सिंधूने प्रथमच थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने शुक्रवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व झुंजीत मलेशियाच्या सोनियाची हिला ३६ मिनिटांतच २१-१७, २१-१३ असे सहज पराभूत करीत विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. या स्पर्धेत आता सिंधूच्या रूपाने एकमेव हिंदुस्थानी आव्हान उरले आहे.
जागतिक ३५ व्या मानांकित सोनियाशी सिंधूचा प्रथमच सामना झाला. जागतिक तिसऱ्या मानांकित सिंधूने सोनियाला सहज पराभूत करीत आपली विजयी दौड कायम राखली. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिका तुनजुंगशी होणार आहे. तुनजुंगने कॅनडाच्या मिशेल लीला २१-१७ ,२ १-८ असे सहज पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली आहे.
…तर सिंधू ही स्पर्धा जिंकणारी दुसरी हिंदुस्थानी
थायलंड ओपन यंदा सिंधूने जिंकल्यास ती ही स्पर्धा जिंकणारी दुसरी हिंदुस्थानी महिला बॅडमिंटनपटू ठरेल. यापूर्वी हिंदुस्थानच्या सायना नेहवालने २०१२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती





























































