महिला अबला नसून सबला आहेत – सिंधुताई सपकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

स्त्री शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सावली फाऊंडेशन चे संस्थापक गणेश जाधव दरवर्षी नवरात्री दरम्यान ‘नवशक्ती-नवचेतना’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ‘नवशक्ती-नवचेतना पुरस्कार 2018′ चे तिसरे वर्ष होते. हा सोहळा कैलास पार्क 90 फुटी रस्ता, लेक रोड तुळशेत पाडा भांडुप येथे आयोजीत केला होता. विविध नऊ क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचा झरा असणाऱ्या, कर्तबगार, इतरांसाठी प्रेरक ठरतील अशा नऊजणींना ‘नवशक्ती नवचेतना पुरस्कार 2018’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पारंपारिक युद्ध कलांचे प्रदर्शन सुद्धा सादर करण्यात आले. या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजसेविका मा. डॉ. सौ.सिंधुताई सपकाळ (माई) उपस्थित होत्या. सर्व पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते हे प्रदान केले गेले.

असामान्य व्यक्तिमत्व असलेली जगावेगळी ‘आई अनुजा संख्ये, आशियायी स्पर्धेतील कबड्डीपंच आरती बारी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव, वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनी बोधानवाला, पत्रकारीतेतील उत्तम योगदान, सामाजिक- महिलांचे कर्तुत्व समाजासमोर आणणाऱ्या शेफाली साधू , महिलांना उद्योगाची प्रेरणा देणाऱ्या उद्योजिका इंदू इंगळे , लैंगिक शिक्षणाद्वारे सकस समाज घडविणारी युवती सामाजिक कार्यकर्ती दिपा पवार, शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणारे मातृतुल्य गुरु डॉ.शुभदा जोशी, समाज उद्योजिका मानसी मांजरेकर, समाजसेविका आरती बनसोडे, आणि कलावंत चेतन राऊत या सर्वांना सामाजिक योगदानासाठी सावली फाऊंडेशनने यंदाचा “नवशक्ती नवचेतना पुरस्कार 2018” प्रदान करण्यात आला.

“यावेळी महिला अबला नसून सबला आहेत. आयुष्यात आलेल्या संकटाना धीराने सामोरे जायला हवे. महिलांनी स्वतःला कमकुवत न समजता काम करायला हवं. तुम्ही तुमच्या आयुष्यात आई वडिलांना महत्वाचे स्थान द्या. आई वडिलांना केलेलं उपकार कधीही विसरू नका.” असे मार्गदर्शन सिंधुताईनी दिले.