गायिका कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कार्तिकीने मंगळवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. याबाबत कार्तिकीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. कधी काळी ‘लिटील चॅम्प’ या कार्यक्रमाची विजेती असलेली कार्तिकी आता स्वत:च एका ‘लिटील चॅम्प’ची आई झाली असल्याने तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा पाऊस पाडला आहे.
आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड तिच्या गोड आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तिने अनेक मराठी गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 2020 साली कार्तिकी गायकवाडने रोनित पिसे याच्याशी विवाह केला. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी-रोनित आई-बाबा झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.