
राज्यातील एकल महिलांची संख्या सध्या सुमारे ५४ लाख इतकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, जिल्हानिहाय अद्ययावत आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर ही संख्या ७५ लाखांपर्यंत पोहोचू शकते, अशी माहिती महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी दिली. राज्य सरकारकडून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
बैठकीदरम्यान ग्रामीण भागातून सर्वेक्षणाला समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले. जिल्हानिहाय प्राथमिक आकडेवारीही प्राप्त झाली आहे. मात्र, शहरी भागात महिलांचा सहभाग अपेक्षेप्रमाणे नसल्याने मोठ्या प्रमाणावर नोंदणी राहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा माहिती संकलन मोहीम राबवून पुढील दोन महिन्यांत सुधारित आणि अद्ययावत आकडेवारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अद्ययावत आकडेवारी प्राप्त झाल्यानंतरच एकल महिलांसाठीचे अंतिम धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले. या धोरणामध्ये विधवा, घटस्फोटित, पतीने सोडून दिलेल्या तसेच स्वतंत्रपणे राहणाऱ्या अविवाहित महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि कल्याणविषयक प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे.
एकल महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सविस्तर अभ्यास आणि अचूक माहिती संकलन आवश्यक असल्याचे सांगत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या विद्यमान सर्वेक्षणातील माहितीचा वापर करण्यासोबतच राज्यव्यापी स्वतंत्र सर्वेक्षणही राबवण्याच्या सूचना दिल्या.
एकल महिलांच्या प्रश्नांचा संबंध जवळपास १४ शासकीय विभागांशी असल्याने या धोरणावर काम करणाऱ्या समितीचा विस्तार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकल महिलांना अधिक सुलभपणे मिळावा, त्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि कोणतीही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
एकल महिला
एकल महिलांमध्ये अविवाहित महिलांसोबत, विधवा, घटस्फोटित, पतीने सोडून दिलेल्या (परित्यक्ता) महिला, विभक्त राहणाऱ्या आणि काही प्रकरणांत एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांचाही समावेश होतो.

































































