कुंभमेळ्यातून सव्वा लाख कोटींची कमाई, सहा लाख रोजगारही निर्माण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । प्रयागराज 

15 जानेवारीपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यावर प्रचंड खर्च करण्यात आला असून ही गोष्ट सगळीकडेच चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र 4 मार्चपर्यंत चालणार्‍या या कुंभमेळ्यातून उत्तर प्रदेशला तब्बल 1.2 लाख कोटी महसूल मिळणार आहे तसेच सहा लाख रोजगार निर्मितीही होणार आहे. ‘सीआयआय’ अर्थात ‘इंडस्ट्री बॉडी कॉन्फेडरेशन इंडस्ट्री’च्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या कुंभमेळ्याचे आयोजन केले आहे.

50 दिवसांच्या या कुंभमेळ्यासाठी तब्बल 4 हजार 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम 2013 च्या कुंभमेळ्याच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. त्यामुळे हा कुंभमेळा आतापर्यंतचा सर्वात महागडा ठरणार आहे.

या क्षेत्रात होणार रोजगार निर्मिती

 ‘सीआयआय’च्या अहवालानुसार हॉस्पिटिलिटी सेक्टरमध्ये अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार असून एअरलाइन्स आणि एअरपोर्टस्वर तब्बल दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. यावाय टूर ऑपरेटर्स क्षेत्रात 45 हजार लोकांना रोजगार मिळेल. इको टुरिझम आणि मेडिकल टुरिझममध्ये 85 हजार लोकांना तर टूर गाइडस्, टॅक्सी ड्रायव्हर, विविध असंघटित क्षेत्रात 50 हजार नोकर्‍या उपलब्ध होणार असून यात सरकारी संस्था आणि व्यापार्‍यांच्या कमाईचा आकडा प्रचंड वाढणार आहे.

शेजारच्या राज्यांनाही फायदा

उत्तर प्रदेश सरकारच्या या आयोजनातून 1.2 लाख कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय शेजारील राज्ये राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशलाही महसूल मिळण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या संख्येने येणारे पर्यटक शेजारील राज्यांमध्येही फिरणार आहेत. तसेच जगभरातूनही पर्यटक येत आहेत.

परिसरही दुपटीने मोठा

मागील सरकारने 2013 च्या कुंभमेळ्यावर 1,300 कोटी रुपये खर्च केले होते. कुंभमेळ्याचा परिसर यंदा दुप्पट मोठा करण्यात आला आहे. यंदा 3,200 हेक्टर परिसरात कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वेळी हा परिसर 1,600 हेक्टर इतकाच होता.