सहा महिन्यांत विनामास्क फिरणाऱ्या दीड लाख लोकांवर कारवाई, साडेतीन कोटींचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सर्व फोटो - संदीप पागडे

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विनामास्क फिरणार्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांत पालिकेची जोरदार कारवाई सुरूच असून मुंबई महानगरपालिकेने दीड लाख लोकांवर कारवाई करत त्यांच्याकडून आतापर्यंत 3 कोटी 49 लाख 34 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबईत कोरोचा रुग्ण सापडू लागल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करून दंडात्मक कारवाई सुरू केली. त्याच्या जोडीला रस्त्यांवर थुंकणाऱयांविरोधातही पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली.

सुरुवातीला विनामास्क फिरणाऱयांविरोधात एक हजाराचा दंड आकारला जात होता. तरीही काही बेजबाबदार मुंबईकर या कारवाई न जुमानता विनामास्क फिरत होते. मुंबई अनलॉक होऊ लागल्यानंतर आणि सणासुदीच्या काळात मुंबईकर मोठया संख्येने रस्त्यावर येऊ लागले, सोशल डिस्टन्सिंग न पाळता, विनामास्क फिरणार्यांची संख्या वाढली.

त्यामुळे दंडाची रक्कम कमी करून ती 200 रुपयांवर आणत कारवाईची तीव्रता वाढवण्यात आली. त्याचबरोबर विनामास्क फिरणार्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करत दर दिवशी सुमारे 20 हजार लोकांवर कारवाई करावी, असे आदेश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले. त्या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्त चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई वेगवान करण्यात आली आहे.

झोन, वॉर्डनिहाय आकडेवारी

प्रभागाच्या झोन 1 मध्ये येणाऱया ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ वॉडमध्ये आतापर्यंत 29 हजार 938 विनामास्क फिरणार्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून 65 लाख 56 हजार 100 रुपये वसूल केले.

झोन दोनमध्ये येणाऱया एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर या वॉर्डमध्ये 28 हजार 292 लोकांवर दंडात्मक कारवाई करून 59 लाख 89 हजार 700 रुपये वसूल केले.

झोन तीनमध्ये येणाऱया एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व वॉर्डमधील 19 हजार 716 लोकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 42 लाख 28 हजार 800 रुपये वसूल केले.

झोन चारमध्ये येणाऱया के/पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर या वॉर्डमधील 20 हजार 908 लोकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 47 लाख 31 हजार रुपये वसूल केले.

झोन पाचमध्ये एल, एम/पूर्व, एम/पश्चिम या वॉर्डमधील 21 हजार 312 लोकांवर दंडात्मक कारवाई करून 47 लाख 25 हजार 900 रुपये वसूल केले.

झोन सहामध्ये येणार्या एन, एस, टी या वॉर्डमधील 19 हजार 266 लोकांवर दंडात्मक कारवाई करून 38 लाख 97 हजार 800 रुपये वसूल केले.

झोन सातमध्ये येणाऱ्या आर/दक्षिण, आर/मध्य, आर/उत्तर या वॉर्डमधील 20 हजार 847 लोकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 48 लाख 5 हजार 500 रुपये वसूल केले.