आंबा घाट नियोजनाबाबत बैठक; सहा टायर पर्यंतच्या वाहनांना प्रवासासाठी परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मात्र अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आंबा घाटातील नियोजनाबाबत जिल्हयाचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह बैठक झाली. ॲङ अनिल परब म्हणाले, किती वजनाची आणि कोणत्या प्रकारची वाहने आंबा घाटातून वाहतूकीसाठी अनुज्ञेय राहतील, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लेखी कळवावे. सहा टायरपेक्षा जास्त तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कळविलेल्या वजनापेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांना घाटातून प्रवासासाठी पूर्ण प्रतिबंधीत करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी घाटाच्या प्रवेश ठिकाणांवर चौकीवरुन 24 तास कडकपणे नियंत्रण करावे आणि एकही मोठे व अवजड वाहन घाटातून येणार नाही, याची दक्षता दोन्ही जिल्हयातील पोलिसांनी घ्यावी. तसेच घाटाच्या दोन्ही प्रवेश ठिकाणाव्यतिरिक्त घाट रस्त्यामधील भागातील वाहतुकीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पर्यवेक्षण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने साखरपाकडील 3 कि.मी. अंतरावर असलेल्या धबधब्याच्या ठिकाणीची पाहणी करुन जलमार्ग मोकळा करावा तसेच या ठिकाणी धबधब्याच्या इतरत्र गेलेल्या प्रवाहामुळे दरड कोसळणार नाही, याबाबतच्या उपाययोजना कराव्यात.

घाटाच्या रस्त्याच्या कामांमुळे बंद असलेले अथवा झालेले जलमार्ग मोकळे करावेत. पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी रस्त्याखाली पाईप, इतर व्यवस्था करावी जेणेकरुन भविष्यात दरड कोसळणार नाही. ज्या ठिकाणी घाटाचे टोजस कामाच्या दरम्यान तुटला असल्यास तो पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सहा टायरपेक्षा जास्त टायरच्या गाडीला घाटातून प्रवासासाठी पूर्ण प्रतिबंधीत करावे. तसेच एस.टी विभागाने आदेश प्राप्त होताच घाटातून काळजीपूर्वक आणि दक्षता घेत सुरक्षितपणे प्रवासी वाहतूक सुरु करावी. राष्ट्रीय महामार्ग विभागाने घाटाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून मुदतीत दर्जेदार काम करुन घ्यावे आणि विभागाने घाटातील कामाची अद्ययावत माहिती वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी, असेही ते म्हणाले.