माहीमच्या फुटपाथवरून चिमुकली बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

माहीमच्या सेनापती बापट मार्गावरील रेल्वे फाटकाला लागून असलेल्या फुटपाथवर राहणारी सहा वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सदर मुलीचा कसून शोध घेत आहेत.

सेनापती बापट मार्गावरील फुटपाथवर ती चिमुकली तिच्या पालकांसोबत राहत होती. बुधवारी पहाटे चारनंतर ती मुलगी जागेवर नसल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध करण्यात आली पण मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर पालकांनी माहीम पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला व मुलीचा शोध सुरू केला. काही दिवसांपूर्वी फुटपाथवरच पालकांसोबत राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे माहीममधील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.