दहाच्या आत झोपायला जाताय? मग होऊ शकतो हा धोका…

लवकर निजे, लवकर उठे त्याला आरोग्य आयुष्य लाभे, असं म्हणतात. लवकर झोपणे आणि लवकर उठणे या चांगल्या सवयी आहेत. त्याने आरोग्य उत्तम राहते. पण, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, रात्री दहाच्या आत झोपायला जाणं हे आरोग्यासाठी घातक असू शकतं, असं उघड झालं आहे.

स्लीप मेडिसीन नावाच्या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका अहवालात चक्क झोपेच्या वेळेचा आरोग्याशी थेट संबंध असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात 21 देशांमधील नऊ हजारांहून अधिक मृत्यूंचा अभ्यास केला गेला. यातील अनेक जणांना रात्री वेगवेगळ्या वेळांमध्ये झोपायची सवय होती.

या अहवालातून असा निष्कर्ष काढला गेला की, माणसाला सहा ते आठ तास झोप गरजेची असते. त्याहून कमी झोप ही आरोग्यासाठी अपायकारक असते. तसेच झोपेची वेळही अनेक बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावते. जे रात्री तीन नंतर आणि सायंकाळी सातच्या आधी झोपतात त्यांना ज्याप्रमाणे आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. त्याचप्रमाणे रात्री दहापूर्वी झोपणंही आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं, असं हा अहवाल सांगतो.

तज्ज्ञ सांगतात की, झोपेच्या अनियमित वेळा या शरीराच्या घड्याळातील सिर्काडियन ऱ्हिदम्सची निगडीत असतात. सिर्काडियन ऱ्हिदम्स या आपल्या शरीराच्या 24 तास चालणाऱ्या घड्याळाचा एक महत्त्वाचा भाग असतात, ज्या निद्रावस्थेतही आपल्या सर्व अवयवांचं नियोजन नीट राखतात. शरीरातील निरानिराळ्या प्रणालींचं काम या सिर्काडियन ऱ्हिदम्सच्या ठेक्यावर चालत असतं. सिर्काडियन ऱ्हिदम्स या झोपेचं सातत्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. झोपेच्या अनियमित वेळा सिर्काडियन ऱ्हिदम्सच्या कामात अडथळा आणतात. त्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

जसं उशिरा झोपणं हृदयविकार किंवा मृत्युला कारणीभूत ठरू शकतं, तसंच नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर झोपल्याने हायपर थायरॉईड, लठ्ठपणा किंवा मधुमेहासारखे विकार जडू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या