कमी रकमेच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर होणार फायदा; व्याजदर वाढण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भविष्याच्या आर्थिक तरतूदीसाठी कमी रकमेच्या दीर्घ मुदतीच्या योजना फायदेशीर असतात. गुंतवणुकीत अशा योजनांचा महत्त्वाचा वाटा असतो. तसेच चांगल्या परताव्यासाठीही अनेकजण अशा योजनांमध्ये गुंतवणूक करतात. दर महिन्याला किंवा वर्षाला ठराविक रक्कम योजनेत जमा केल्यास काही वर्षांत त्याचा चांगला परतावा मिळतो. अशा स्मॉल सेव्हिंग स्कीम सुरक्षितही असतात. तुम्ही अशा योजनांमध्ये गुतंवणूक करत असल्यास याबाबत खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. आगामी तिमाहीसाठी या योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

आगामी तिमाही म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पीपीएफ, एनएससी, सुकन्या यासारख्या स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्यावर मिळणाऱ्या परताव्यात वाढ होते. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होणार आहे. जुलै ते सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीत व्याजदरात बदल करण्यात आले नव्हते. त्यामुळे आगामी तिमाहीत व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशा स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदराबाबत सरकारकडून प्रत्येक तीन महिन्यात आढावा घेण्यात येतो. त्यानुसार व्याजदरात वाढ किंवा कपात करण्याचा निर्णय घेतला जातो. व्याजदर वाढल्यास गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होतो. तर व्याजदरात कपात झाल्यास गुंतवणूकदारांना कमी परतावा मिळतो. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांमध्ये 7.4 टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेसाठी 7.6 टक्के व्याजदर आहे. सुकन्या योजना मुलींच्या भविष्यातील आर्थिक तरतूदीच्यादृष्टीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्यास गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होणार आहे.