स्मृतीची ‘विराट’ कामगिरी!ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 50 चेंडूंत झळकावले शतक

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक शतकी खेळी करून ऐतिहासिक कामगिरी केली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 412 धावांचा डोंगर उभारल्यानंतर प्रत्युत्तरात स्मृतीने चमक दाखवली. या निर्णायक सामन्यात हिंदुस्थानचा 43 धावांनी पराभव झाला, मात्र मानधनाने अवघ्या 50 चेंडूंत शतक ठोकून सुपरस्टार विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱया हिंदुस्थानींच्या यादीत स्मृतीने अव्वल क्रमांक पटकावला.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्मृतीने 5 षटकार आणि 17 चौकारांच्या मदतीने 63 चेंडूंत 125 धावांची आक्रमक खेळी केली. तिला दीप्ती शर्मा (58 चेंडूंत 72 धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (35 चेंडूंत 52 धावा) यांनी चांगली साथ दिली. परंतु अखेरच्या काही षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ यजमानांना वरचढ ठरला अन् हिंदुस्थानला सामन्यासह मालिका गमवावी लागली.

वन डेमधील ‘वेगवान’ हिंदुस्थानी
स्मृती मानधना 50 चेंडू, ऑस्ट्रेलिया 2025
विराट कोहली 52 चेंडू, ऑस्ट्रेलिया 2013
वीरेंद्र सेहवाग 60 चेंडू, न्यूझीलंड, 2009
विराट कोहली 61 चेंडू, ऑस्ट्रेलिया 2013
मो अझरुद्दीन 62 चेंडू, न्यूझीलंड 1988
के. एल. राहुल 62 चेंडू, नेदरलँड्स 2023
रोहित शर्मा 63 चेंडू, अफगाणिस्तान 2023
युवराज सिंग 64 चेंडू, इंग्लंड 2008
केदार जाधव 65 चेंडू, इंग्लंड, 2017
सुरेश रैना 66 चेंडू, हाँगकाँग, 2008