
आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी उत्तर प्रदेशमधून विक्रीसाठी गावठी कट्टा आणणार्या तस्कराला कल्याण गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सोनू पटवा असे अटक आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
कोळसेवाडी परिसरात राहणार्या तरुणाने गावठी कट्टा विक्रीसाठी आणल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सोनूला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी उत्तर प्रदेश येथून गावठी कट्टा मुंबईत विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्याने पूर्वी राहात असलेल्या दिवा-अगासान रोडवरील निर्जन स्थळी हा गावठी कट्टा लपवून ठेवल्याचे कबूल केले.
पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन गावठी कट्टा ताब्यात घेतला. ही कारवाई कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय माळी आदींनी केली. गुन्हे शाखेने हे प्रकरण मुंब्रा पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे.

































































