भाजी वाहतुकीच्या नावाखाली डुप्लिकेट देशी दारूची तस्करी, एकाला अटक

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजी वाहतुकीच्या नावाखाली डुप्लिकेट देशी दारूची तस्करी होत असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातून चंद्रपूरकडे अवैधरित्या देशी दारू आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर माढेळी-वरोरा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली.या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एक वाहन थांबवून तपासणी केली असता शेपू भाजीच्या कॅरेटमध्ये लपवून ठेवलेली तब्बल 150 पेट्या बनावट देशी दारू आढळून आल्या.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे 6 लाखांची दारू, 15 लाखांचे वाहन आणि मोबाईलसह एकूण 21 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील सागर अशोक परदेशी याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.