समाजसेवेचा वसा

सर्वसामान्य कुटुंबातील मी गृहिणी आहे. लग्नानंतर मी दहा वर्षे नोकरी केली, पण कालांतराने माझी कंपनी बंद पडली. त्यानंतर मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. माझे मिस्टर समाजकार्यात कार्यरत होते. त्यांच्याबरोबरीने मलाही समाजकार्यामध्ये रुची निर्माण झाली. अनेक कार्य करता करता मी निवडणूक लढवून ग्रामपंचायत सदस्या झाले. त्याचबरोबर अनेक मंडळांवर कामही करू लागले. समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यासच घेतला होता. त्यासाठी गावातील महिलांसाठी काहीतरी करायचे असे ठरवले आणि २००८ साली बचतगटाची स्थापना केली. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू, सहली, अनेक कार्य महिलांसाठी करीत राहिले. याबरोबरच काही मान्यवरांच्या आर्थिक मदतीने पाककला, खेळण्याच्या स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे. गावातील महिलांनी स्वतःच्या विचाराने चालावं म्हणून त्यांच्याशी हितगुज करणे, अनेक रुढी-परंपरेविषयी माहिती देणे असे मार्गदर्शन सुरूच असते. आता माझ्या मुलाचे लग्नही झाले त्यामुळे जबाबदारी वाढली आहेच आणि आवडही वाढली आहे. घर, संसार सांभाळून नातेवाईक मित्र-मैत्रिणी त्यांच्याशी संपर्क चालूच आहे. नेहमी काहीतरी वेगळं करावं असं माझं मन मला सतत प्रेरणा देते आणि त्यातूनच मी माझं वेगळेपण नेहमी जपते. घरातील ऍरेन्जमेंट म्हणजे काहीतरी वेगळंच… नावीन्यपूर्ण माझ्या विचारात भर घालते.

आपली प्रतिक्रिया द्या