
सामना प्रतिनिधी । बीड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, 500 गावांमध्ये महाअभिषेक, खिचडी वाटप, फळवाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली आहे.
बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस प्रचंड उत्साहात विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यामध्ये जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यात वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, फळवाटप, शिरूर तालुक्यात वृक्षारोपण, बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथे गोरगरीब महिलांना साड्या व शालेय साहित्य वाटप, नागापूर येथे शालेय साहित्य, पालवण येथे शालेय ड्रेस व साहित्य, बीड शहरातील सोमेश्वर मंदिर येथे महाअभिषेक, शासकीय दवाखान्यात खिचडीचे वाटप, भवानवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यात देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यात इतर ठिकाणी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातील 500 गावांमध्ये हनुमानाच्या मंदिरात अभिषेक घालण्यात येणार आहे.
बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांना शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
























































