पंचांच्या ‘सॉफ्ट सिग्नल’वर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेळ हा मैदानात जरी खेळला जात असला तरी याचे आराखडे संगणकावर आखले जातात. सध्याच्या घडीला अत्याधुनिक यंत्रणांचा प्रत्येक खेळांमध्ये सर्रास वापर केला जात आहे. पण अशा परिस्थितीतही आंतरराष्ट्रीय लढतीदरम्यान अक्षम्य चुका झाल्या तर काय म्हणायला हवे? असाच धाटणीचा प्रश्न हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील चौथ्या टी-20 लढतीदरम्यान निर्माण झाला.

सूर्यकुमार यादवचा झेल डेव्हिड मलानकडून नीट टिपला गेला की नाही याचे सबळ पुरावे रिप्लेमध्ये दिसले नसल्यामुळे मैदानातील पंचांचा ‘सॉफ्ट सिग्नल’ बाद असल्यामुळे तिसऱया पंचांनाही तोच निर्णय कायम ठेवावा लागला. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या नियमावर माजी क्रिकेटपटूंपासून सर्वांनीच टीका केली. तसेच आयसीसीकडून हा नियम बदलावा असा सूरही यावेळी उमटू लागला.

पंचांना दूरवरचे कसे दिसते?

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील चौथ्या टी-20 लढतीदरम्यान दोन वेळा मैदानातील पंचांकडून सॉफ्ट सिग्नल देण्यात आला. सूर्यकुमार यादव व वॉशिंग्टन सुंदर या दोघांचा झेल अनुक्रमे डेव्हिड मलान व अदिल रशीद यांनी टिपले होते. दोन्ही झेल मैदानातील पंचांपासून दूरवर झेलले होते.

अशा परिस्थितीतही मैदानातील पंचांनी ‘सॉफ्ट सिग्नल’ बाद देण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी समालोचकांनी यावर टीका करताना म्हटले की, इतक्या दूरवरचे पंचांना दिसले कसे? पंचांनी अशा वेळी कोणताही सॉफ्ट सिग्नल द्यायला नकोय. हे पटण्यासारखे नाहीए असा सूर यावेळी निघू लागला आहे.