जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागास साडेसहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त असून, यातून कोल्हापूर पद्धतीचे 27 आणि 119 सिमेंट बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात जलसंधारण समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सिमेंट बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदी कामांना मंजुरी देऊन त्याची स्थळनिश्चिती करण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त असलेल्या 1 कोटी 15 लाखांच्या कामातून कोल्हापूर पद्धतीचे 27 बंधारे बांधण्यात येणार आहेत. शून्य ते शंभर हेक्टर क्षेत्रापर्यंत सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी 5 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर आहे. या निधीतून ग्रामीण भागात 119 ठिकाणी ही कामे करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.
या समितीच्या बैठकीस उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता धांडोरे, सदस्य बळीराम साठे, मंगल कल्याणशेट्टी, शिला शिवशरण आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे जलसंधारणाची कामे पूर्णपणे रखडली गेली आहेत. येत्या मार्चअखेरपर्यंत कामांना गती देऊन निधी वेळेत खर्च करण्यात यावा, अशाही सूचना अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.


























































