
शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून रस्ता, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनसाठी मोठय़ा प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी सर्व्हे करून रस्तेदुरुस्तीची 15 कोटींची निविदा काढण्याच्या हालचाली ‘स्मार्ट सिटी’ प्रशासनाकडून चालू आहेत. तसे पत्र महापालिका आयुक्तांनी ‘स्मार्ट सिटी’चे अध्यक्ष असिफ गुप्ता यांना पाठवले आहे.
सोलापूर शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत विकासकामे चालू आहे. कोटय़वधीचे रस्ते करण्यात आले आहेत. शहराच्या गावठाण भागात मोठय़ा प्रमाणात रस्ते विकासाची कामे चालू आहेत. मात्र, निधीअभावी काही रस्त्यांची कामे रखडली आहेत. या अर्धवट रस्त्यांचा नाहक त्रास होत आहे.
पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले तसेच प्रलंबित रस्ते आणि अर्धवट रस्त्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’ प्रशासनाच्या विरोधात मोठी नाराजी आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या वतीने आंदोलनदेखील करण्यात आली. मात्र, निधीअभावी महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी प्रशासन यांच्यात वाद चालू होता. महापालिका प्रशासनाने निधी दिला नाही त्यामुळे कामे रखडल्याचा खुलासा ‘स्मार्ट सिटी’ प्रशासनाने केला होता. पदाधिकाऱयांनी अतिरिक्त निधीची तरतूद करत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देत हा निधीदेखील वर्ग केला आहे. आता अशा रस्त्यांचा सर्व्हे करण्यात येत आहे. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत करण्यात आलेले रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठय़ासाठी झालेली खोदाई, प्रलंबित रस्ते अशा 40 ते 45 रस्त्यांचा सर्व्हे केला जात आहे. हे सर्व रस्ते दुरुस्तीसाठी किमान 15 कोटी लागणार आहे. याबाबतचे नियोजन महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी प्रशासनाकडून चालू आहे. लवकरच रखडलेली आणि प्रलंबित रस्त्यांच्या कामासाठी 15 कोटींची निविदा काढली जाणार आहे.



























































