सोलापूरमध्ये घुमला ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष, आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त शिस्तबद्ध ग्रंथदिंडी

हलग्यांचा कडकडाट, ढोल—ताशा आणि तुतारीच्या निनादामध्ये ‘येळकोट येळकोट जय मल्हार…’ ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करीत आदिवासी धनगर साहित्य संमेलनानिमित्त शिस्तबद्ध अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. याद्वारे आदिवासी धनगर संस्कृती व परंपरांचे दर्शन घडले. गजनृत्य, झांज, टिपरी, गजढोल व लेझीम पथकांचे बहारदार खेळ सादर करण्यात आले.

श्री संत सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन 24 व 25 फेब्रुवारी रोजी श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर विजापूर बायपास महामार्ग बेलाटी येथे होत आहे. या निमित्ताने आज सकाळी बेलाटीचे श्रीराम पाटील यांच्या वाडय़ाजवळील श्री लक्ष्मी मंदिर येथून या ग्रंथदिंडीस मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते पूजन करून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संमेलनाचे उद्घाटक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष राजा माने, संमेलन अध्यक्ष माजी आ. ऍड. रामहरी रुपनवर, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील, प्राचार्य आर. एस. चोपडे, महादेव कोगनुरे, अमरजित राजे बारगळ, कवी गोविंद काळे, प्राचार्य संजय शिंगाडे, साहित्यिक बापूसाहेब हाटकर, उपाध्यक्ष संभाजीराव सूळ, सिद्धारूढ बेडगनूर, अण्णाप्पा सतुबर, बाळासाहेब कर्णवर – पाटील, प्रा. कुंडलिक आलदर, बिसलसिद्ध काळे, शेखर बंगाळे, जगन्नाथ पैकेकरी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिस्तबद्धरीत्या काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये पालखीसह टिपरी, लेझीम, झांज, गजढोल, गजनृत्य पथके सहभागी झाली होती. महिला व पुरुष यांच्या गजनृत्य पथकाने बहारदार सादरीकरण केले. टिपरी, लेझीम गजढोल, झांज पथकांनी लक्ष वेधले. जेऊरच्या हलग्यांचा कडकडाट झाला. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस असे खेळांचे विविध प्रकार सादर केले. ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात ‘येळकोट येळकोट जय मल्हार…’ ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करीत भंडाऱयाची उधळण करीत मंगलमय वातावरणात ही दिंडी पुढे संमेलनस्थळी मार्गस्थ झाली.

पालखीमध्ये गीता आणि होळकर शाहीतील पुस्तके

या पालखीमध्ये भगवद् गीता आणि होळकर शाहीतील ऐतिहासिक पुस्तके, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार…’ ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष अशा उत्साही वातावरणात ही दिंडी काढण्यात आली.

या शिक्षण संस्थांचा होता सहभाग

n या दिंडीमध्ये ज्ञानसंपदा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, एम. एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्ट कुंभारी, कमलाबेन पटेल बीएससी नार्ंसग परिचारिका महाविद्यालय कुंभारी, सांगली जिह्यातील म्हसवड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था यासह शहर जिह्यातील विविध शिक्षण संस्थांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.